अकरावीच्या अर्जाचा आजपासून सराव! शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

अकरावीच्या अर्जाचा आजपासून सराव! शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव दहावीच्या निकालाच्या अगोदरच होणार आहे. 22 आणि 23 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तसेच 24 मेपासून प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. ज्योती परीहार यांनी दिली आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्यात केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे असतात.

दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती कळावी यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून, 24 मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाइन अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. त्याआधी 22 ते 23 मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. प्रवेशाचे रितसर वेळापत्रक केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. ज्योती परीहार यांनी जाहीर केले आहे. दहावीच्या निकालानंतर कमी कालावधीत सर्व प्रवेश पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाचे आहे. यामुळे मे महिन्याच्या 21 मे तारखेपासून तयारी केली आहे. विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशासंदर्भातील माहिती देण्याचे आदेशही शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. जागा व तुकड्यासंदर्भात नोंदणीत बदल केले जाणार आहेत. या कालावधीत महाविद्यालयातील उपलब्ध जागा, विषय बदल, वाढीव तुकडी आदी माहितीसंदर्भात बदल करण्यासाठी मुभाही देण्यात आली आहे.

असे असेल अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

विद्यार्थी पालक, प्रशिक्षण जनजागृती (21 मेपासून दोन दिवस); नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव (22 ते 23 मे); प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरणे (24 मेपासून पुढे दहावी (एसएससी बोर्डाच्या) निकाल लागल्यानंतर दोन दिवसांपर्यंत); अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे (24 मेपासून पुढे दहावी निकालानंतर दोन दिवसांपर्यंत); कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी (22 मेपासून दहावी निकालापर्यंत); कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे (अर्ज भाग 2)- (दहावी निकालानंतर पाच दिवस (प्रत्येक फेरीपूर्वीही संधी); कोटा अंतर्गत प्रवेश (दहावी निकालानंतर पाच दिवस); नियमित प्रवेश फेरी 1 (दहावी निकालानंतर 10 ते 15 दिवस); नियमित प्रवेश फेरी 2 (7 ते 9 दिवस); नियमित प्रवेश फेरी 3 (7 ते 9 दिवस); विशेष फेरी 1 (7 ते 8 दिवस); विशेष फेरी 2 (एटीकेटीसह) (एक आठवडा); दैनंदिन प्रवेश फेरी (आवश्यकता भासल्यास).

महत्त्वाचे बदल

  • प्रथम प्राधान्य फेरी यंदा होणार नाही.
  • मागासवर्गीय, विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आताच काढून ठेवा.
  • संबंधित महसूल यंत्रणांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पुरविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे शिक्षण विभागाचे आवाहन.
  • विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रवेशाची पूर्वतयारी सुरू करावी.
  • विद्यार्थी, पालक यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग घ्यावेत.
  • शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
  • यंदा विशेष फेरी 1 नंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार.

गेल्या वर्षीच्या प्रवेशाची आकडेवारी

  • एकूण महाविद्यालये – 331
  • एकूण जागा – 117990
  • प्रवेश – 78130
  • रिक्त जागा – 39860
  • कोटा जागा – 15984
  • कोटा प्रवेश – 8808
  • कोटा रिक्त जागा – 7176

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news