

पौड रोड: शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या चांदणी चौकातून दररोज हजारो वाहनचालक प्रवास करतात. मात्र, परिसरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे पौड रोड वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. त्यातच अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी या मार्गावर काही मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालक आणि नागरिकांचा मोठा वेळ जात आहे.
वनाज ते चांदणी चौकादरम्यान मेट्रो विस्ताराचा विस्तार होणार आहे. या मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक, असे दोन स्टेशन असणार आहेत. सध्या आयटी पार्कजवळ बॅरीकेड लावून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, आयटी पार्क परिसरात असलेला तीव उताराचा भाग आणि मेट्रोच्या कामासाठी लावलेले बॅरिकेडमुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, पौड रोडवर सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याचा मोठा भाग बॅरिकेडने व्यापला आहे. एका लेनवरून वाहनांची ये-जा सुरू असताना काही वाहनचालक रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करीत आहेत. परिणामी कोथरूड, डेक्कन दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यात हा मार्ग तीव उताराचा असल्याने कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मात्र, या ठिकाणी वाहतूक पोलिस दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत पौड रोड वाहतूक विभागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
चांदणी चौक परिसरात वाहनांची नेहमीच वर्दळ
चांदणी चौक हा मुंबई-पुणे महामार्गावर आहे. तसेच येथून बावधन, भूगाव, पिरंगुट आणि पुढे ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जात येते. या चौकात पीएमपीचा मुख्य बसथांबाही आहे. परिसरात अनेक दवाखाने, दुकाने, खासगी क्लासेस आणि आयटी पार्क असल्याने या चौकासह पौड रोडवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.
चांदणी चौक परिसरातील पौड रोड वाहतूक सुरळीत या भागातील रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
प्रशांत कानोजिया, सामाजिक कार्यकर्ते