

जुन्नर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारातील एका खोलीमध्ये सध्या आधार कार्डाची सर्व कामे केली जात असून, या ठिकाणी नागरिकांची दिवसभर मोठी गर्दी असते; परंतु सध्या तर शासकीय खोलीची मोठी दुरवस्था झालेली असून, पावसाचे पाणी भिंतीतून व छतातून झिरपून खोलीतील जमिनीवरून वाहत असून, पाण्यामुळे भिंतींना मोठी ओल आली आहे. याच भिंतीवर वीजपुरवठाचे मीटर व इतर वायरिंग तसेच संगणकाची वायरिंग असल्याने पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार कार्डाचे काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत.
या कार्यालयात 3 ते 4 संगणक व इतर साहित्य असून, त्यांचे वायरिंग या ओल्या भिंतींवरच आहे. भिंतींतील पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आधार कार्डाबाबतची विविध कामे या ठिकाणी होत असल्याने तालुक्याच्या विविध भागांतून अनेक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी या ठिकाणी येत असल्याने दिवसभर येथे मोठी गर्दी असते; परंतु होणार्या गर्दीच्या मानाने या खोलीतील जागा अपुरी पडत आहे. तसेच येथे आलेल्या नागरिकांना खोलीत बसण्याची सुविधा नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना ताटकळत बर्याच वेळ उभे रहावे लागते. येथे होणार्या गर्दीच्या मानाने ही जागा अतिशय गैरसोयीची आहे; परंतु नाईलाजाने नागरिकांना अशा परिस्थितीतही आपली कामे करून घ्यावी लागत आहेत.
कर्मचारी जीव मुठीत धरून दिवसभर नागरिकांना सेवा देत आहेत. खोलीच्या छताचा भाग व भिंतींचा इतर भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे ओल आल्याने तो ठिसूळ बनून खाली पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महसूल प्रशासनाने या दूरवस्थेबाबत गांभीर्याने लक्ष घालून तातडीने सुधारणा करण्याची मागणी येथे येणार्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा