ज्ञानेश्वर बिजले
पुणे : लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणार्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेय घेण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विमानतळाचा मुद्दा बुधवारी थेट लोकसभेत उपस्थित केल्याने, भाजपने आज तातडीने हालचाल करीत पुण्यात पत्रकार परिषद घेतानाच दुसर्या बाजूला थेट दिल्ली गाठत मंर्त्यांशी संवाद साधला. दोन्ही पक्षांचे नेते या मागणीसाठी पत्रकार परिषदा घेत निवडणुकीच्या तोंडावर विकासकामाचे श्रेय मिळविण्यासाठी धडपडू लागले आहेत.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात गुरुवारी विमानतळावर पत्रकार परिषद घेत विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी केली. दुसरीकडे दिल्लीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यासमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सचिव राजेश पांडे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेत पुण्यातील विमानतळासंदर्भात चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.
भाजपमध्ये दोन गट पडून ते स्वतंत्रपणे विमानतळाबाबत मागणी करू लागले आहेत किंवा कसे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दुस-या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने एकाचवेळी पुणे व दिल्लीत विमानतळासंदर्भात मागणी करीत त्यांच्या पक्षाच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याकडे पुणेकरांचे लक्ष वेधले, असाही युक्तिवाद करण्यात येऊ लागला. बापट दिल्लीतून पुण्यात येत विमानतळावरच पत्रकारांना भेटले, तर पुण्यातील भाजपचे नेते थेट दिल्लीत पोहोचत मंत्र्यांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विमानतळाविषयी बोलू लागताच, हे काम आम्हीच करीत असल्याचे भाजपच्या नेत्यांनी ठासून सांगितले.
जिल्ह्यातील नियोजित विमानतळाची जागा निश्चित झाली असून, त्याबाबतच्या आक्षेपासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेण्याची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच सांगितले. त्यातच नागरी विमान वाहतुकीच्या मागण्यांवर लोकसभेत बुधवारी चर्चेत सहभागी होताना श्रीनिवास पाटील व सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पुण्यासाठी तातडीने स्वतंत्र नवे विमानतळ बांधावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या या जोरकस मागणीमुळे भाजपची यंत्रणा खडबडून जागी झाली.
पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम 2018 मध्येच सुरू झाले. साठ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले असून, या वर्षअखेरीपर्यंत त्याचा वापर सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यातील विमानतळ कमी पडत नसल्याचे आणि ते काम भाजपने केल्याचे भाजपच्या नेत्यांनी ठासून सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियोजित विमानतळाची जागा त्याच परिसरात बदलण्याची मागणी झाली. त्यावर संरक्षण विभागाने काही आक्षेप घेतल्याची चर्चाही सुरू झाली. अशा वेळी पूर्वी मान्य झालेल्या जागीच नियोजित विमानतळ सुरू करण्याची सूचना भाजपच्या शिष्टमंडळाने संरक्षणमंत्र्यांना भेटून केली. त्यामुळे, संरक्षणमंत्री यांच्याकडे बैठकीची मागणी पवार यांनी करण्यापूर्वीच भाजपने तेथे आघाडी घेतली.
महापालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आता शहर व जिल्ह्यातील मोठ्या विकासकामांचे श्रेय आपल्या पक्षाकडे खेचून घेण्यासाठी धडपडू लागले आहेत. मेट्रो पाठोपाठ आता विमानतळाच्या विषयात हे दिसून आले. नदीसुधार योजनेवरूनही दोन्ही पक्षांत खडाजंगी सुरू झाली आहे. हेच मुद्दे पुढील निवडणुकीत चर्चेला राहणार असल्याने, दोन्ही पक्षाचे नेते सावध होत आपापली भूमिका जोरकसपणे मांडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.