पुणे : …तरच टिकाल अन्यथा उचलबांगडी अटळ ! पोलिस दलात लवकरच मोठे अंतर्गत बदल

पुणे : …तरच टिकाल अन्यथा उचलबांगडी अटळ ! पोलिस दलात लवकरच मोठे अंतर्गत बदल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि सह पोलिस संदीप कर्णीक यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे शहर पोलिस दलात लवकरच मोठे अंतर्गत फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. वर्षभरात कामगिरी समाधानकारक नसणाऱ्या प्रभारी अधिकार्‍यांचीची थेट उचलबांगडीदेखील होऊ शकते. दैनिक 'पुढारी'शी बोलताना 'ऑफ द रेकॉर्ड' सूत्रांनी ही माहिती दिली.

त्यामुळे प्रभारी पदाच्या खुर्चीवर बसायचे असेल, तर पोलिस अधिकार्‍यांना आपल्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था सांभाळत, गुन्हेगारीला आळा घालून चमकदार कामगिरी दाखवावी लागणार आहे. अन्यथा त्यांची उचलबांगडी अटळ असल्याचे बोलले जाते आहे. गुन्हेगारी वाटेवर चालू पाहाणार्‍या अल्पवयीन (विधीसंघर्षीत) मुलांचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करण्याचा उपक्रम पोलिस आयुक्त म्हणून रितेशकुमार यांनी हाती घेतला. कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून तस्करांचे कंबरडे मोडले.

रात्री उशिरापर्यंत डीजेच्या गोंगाटात मद्यधुंद रात्र जागविणार्‍या पब, हॉटेलवर कारवाई करून त्यांना नियंत्रणात आणले. महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपायोजना हाती घेतल्या. मात्र, गेल्या आठवड्यात शहरात वाहनांची तोडफोड, गोळीबार, कोयत्याने तरुणीवर मध्यवस्तीत माथेफिरूचा हल्ला, त्यानंतर बंद असलेल्या पोलिस चौक्या अशा घटना समोर आल्या. त्याचे तीव्र पडसात उमटल्याने टीकेचे धनी व्हावे लागले. गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश असला पाहिजे. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या. कारवाईमुळे संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना वेळीच रोखता येते. मात्र तसे काम होताना दिसून येत नाही.

एक हजार गुन्हेगार, 9 हजार पोलिस

गुन्हेगार एक हजार असून, 9 हजार पाचशे पोलिस आहेत. ते गुन्हेगारी संपवू शकत नाहीत का, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला होता. गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, तर तत्काळ वेगळा विचार करावा लागेल, असा इशारादेखील आयुक्तांनी यापूर्वी दिला होता. मात्र, त्यानंतरसुद्धा अशा घटना शहरात घडल्या. त्याचा गांभीर्याने विचार करण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे.

आयुक्तांकडून माहिती घेण्यास सुरुवात

चांगल्या (ए-ग्रेड) पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी बसण्याची प्रत्येक पोलिस निरीक्षकाची इच्छा असते. तेथे आपली वर्णी लागावी म्हणून प्रत्येकाकडून प्रयत्न केले जातात. एकदा का वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची माळ गळ्यात पडली की काही जणांकडून अपेक्षित काम होताना दिसत नाही. त्यांच्या कामाचा फटका पोलिस दलाच्या कामगिरीला बसतो. एक दोन अपवादात्मक घटनामुळे आयुक्तांनी केलेल्या सर्व उल्लेखनीय कामगिरीवर पाणी पडते. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी, गुन्हेगारीची उगमस्थाने, याची माहिती घेतली आहे. त्यानुसार तेथे कोणता अनुभवी अधिकारी काम करेल याची चाचपणी केली जाते. त्यामुळे आगामी कालावधीत आपली खुर्ची टिकवायची असेल, तर प्रत्येक प्रभारी अधिकार्‍यांना कक्षा विस्तारून काम करावे लागणार हे मात्र नक्की.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news