Draupadi Murmu
Draupadi Murmu

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूर दौऱ्यावर; कोराडी, गडचिरोलीत कार्यक्रम

Published on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी (दि. 4 जुलै) सायंकाळी नागपुरात आगमन होणार आहे. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतल्यावर दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात पहिल्या दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. दुसऱ्या दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयार करण्यात आले आहे. दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.

6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील. राष्ट्रपतींच्या दौ-यासाठी प्रशासन सज्ज असून कार्यक्रमस्थळी तसेच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. आज पोलिसांनी काफ़िल्याची रंगीत तालीम केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news