कोल्हापूर : मुश्रीफांच्या शुभेच्छा फलकावरून शरद पवारांचा फोटो गायब | पुढारी

कोल्हापूर : मुश्रीफांच्या शुभेच्छा फलकावरून शरद पवारांचा फोटो गायब

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘पवार एके पवार‘ म्हणणारे हसन मुश्रीफ यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या सोबत जात कॅबिनेट मंत्री म्हणून रविवारी शपथ घेतल्यानंतर मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. मुश्रीफ यांच्या या निर्णयामुळे कागलमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील मातब्बर नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन सत्ता समीकरणे बदलून टाकली आहेत. आज सोमवारी तर अजित पवार गट व शरद पवार गट असे चित्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.आता नेमका कोणता झेंडा हाती घ्यावायाचा यासाठी कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांनी असे कसे काय केले, याचीच चर्चा गावोगावी आणि गल्लोगल्ली रंगली होती. पण त्याचे ठोस उत्तर कोणाकडेही नव्हते.

यानंतर सोमवारी मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. गल्लोगल्लीत डिजिटल फ्लेक्स लागू लागले. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र शरद पवार यांचाच फोटो फ्लेक्सवर नव्हता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मुश्रीफ हे शरद पवारांना दैवत मानत आले आहेत. मग पवार यांचा फोटो कसा काय नाही? आता याचे उत्तर मुश्रीफ यांनाच द्यावे लागणार आहे. आता ते आपल्या दैवताला विसरले काय, असे प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहेत.

Back to top button