

पुणे : आखाती देशांमधील युद्धामुळे शहरातील गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सहकार आयुक्तालय आणि ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या (एमएनजीएल) संयुक्त पुढाकारातून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा हजार सोसायट्यांमधील शंभर टक्के सदनिकांमध्ये ‘पाइप्ड् नॅचरल गॅस’चा (पीएनजी) वापर
करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे नागरिकांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसला (एलपीजी) स्वस्त, सुरक्षित आणि मुबलक असा पर्याय असलेल्या ‘पीएनजी’चा अवलंब करावा, असे आवाहन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साखर संकुलाच्या सभागृहात याबाबत तावरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी बैठक पार पडली. त्यानंतर तावरे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, संचालक (वाणिज्य) मेजर शंकर करजगी, संचालक बागेश्री मंठाळकर, सहकारचे अपर निबंधक राजेश सुरवसे, शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, सहकारच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे व शहर 1 ते 6 चे उपनिबंधक, एमसीडीसीचे मंगेश तिटकारे, जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते.
‘सहकार व एमएनजीएलच्या संयुक्त पुढकारामुळे मोहिमेला गती येणे अपेक्षित आहे. ज्याद्वारे पहिल्या टप्प्यात शहरात ‘एमएनजीएल’ची जोडणी असलेल्या सोसायट्यांमध्ये दोन लाख घरांमध्ये ‘पीएनजी’चा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्यामुळे घरटी दोन याप्रमाणे चार लाख एलपीजी सिलिंडरची बचत होऊन ते सामान्यांच्या घरात उपलब्ध होण्यास मदत होईल.
बागेश्री मंठाळकर, संचालिका, एमएनजीएल,पुणे.