

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५०० नवीन बस दाखल होणार असून, या गाड्यांच्या नियोजनासाठी तातडीने २ हजार चालक आणि २ हजार वाहक अशी एकूण 4 हजार चालक-वाहक यांची कंत्राटी पद्धतीने मेगाभरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची आवश्यक निविदा प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी लवकरच अधिकृत एजन्सीची नियुक्त केली जाणार असल्याची माहिती आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता सध्या अनेक मार्गांवर बस अपुऱ्या पडत आहेत. हाच ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने चालू वर्षात १५०० नवीन गाड्या आणण्याचे नियोजन केले आहे.
मात्र, गाड्या वाढवताना त्यांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ४ हजार चालक-वाहकांची भरती केली जाणार आहे. आणि ही भरती बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एजन्सीची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.
या भरतीमुळे पीएमपीच्या सेवेचा दर्जा तर सुधारेलच, शिवाय ४ हजार बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. नवीन चालक-वाहकांच्या नियुक्तीनंतर मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या वाढतील आणि प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि गतिमान करण्यासाठी आम्ही ताफ्यात नवीन बस आणत आहोत. या गाड्यांचे संचलन प्रभावीपणे होण्यासाठी ४ हजार चालक-वाहकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच सक्षम एजन्सीची निवड केली जाईल. पुरेसे चालक आणि वाहक उपलब्ध झाल्यामुळे बस फेऱ्या चुकणार नाहीत आणि प्रवाशांना वेळेत व दर्जेदार सेवा देणे शक्य होईल.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल