

पुणे: पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएलला आधुनिक करण्यासाठी पीएमपीच्या नव्या अध्यक्षांनी कंबर कसली असून, आता ताफ्यातील बसगाड्यांवर डिजिटल वॉच ठेवला जाणार आहे. ई-बिक्स आणि कार्गो एफएल यांसारख्या सॉफ्टवेअरमधील माहिती एकत्रीकरणामुळे आता बसगाड्या डेपोमध्येच पडून राहण्याच्या प्रकाराला चाप बसणार आहे.
याशिवाय डेपोतून सकाळी बस उशिरा मार्गावर जाणे, बस किती वेळ डेपोसह शहरात कुठे-कुठे उभी होती, याची इत्थंभूत माहिती एका क्लिकने संगणकावर उपलब्ध होणार असून, त्याद्वारे बसगाड्यांच्या संचलनावर कडक नजर ठेवली जाणार आहे. पीएमपीला अत्याधुनिक आणि स्मार्ट ट्रान्सपोर्ट बनविण्यासाठी पीएमपी अध्यक्ष महेश आव्हाड यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार त्यांनी पीएमपीकडील कार्गो एफएल, ई-बिक्स, फाइल ट्रॅकिंग सिस्टिम आणि आपली पीएमपीएमएल या चार विशेष अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणालीला अधिक वेगवान बनविण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे, असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आव्हाड म्हणाले, अनेकदा गाड्या डेपोमध्येच पडून असतात किंवा वेळेवर सुटत नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. आता ई-बिक्स आणि कार्गो एफएल या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक गाडी डेपोमधून नेमकी कधी बाहेर पडली, तिने किती फेऱ्या पूर्ण केल्या आणि ती सध्या कुठे आहे, याची इत्थंभूत माहिती कळणार आहे. यामुळे गाड्या डेपोतच पडून राहण्याच्या प्रकाराला आळा बसेल आणि बस संचलनव्यवस्थेतील त्रुटी सोडविण्यास मदत होईल.
मुख्यालयातूनच डिजिटल नजर
पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली. त्यांच्या नियोजनानुसार, या चारही सॉफ्टवेअरचे इंटिग््रेाशन केल्यामुळे पीएमपीच्या अंतर्गत कामकाजासह संपूर्ण संचलन व इतर सर्व कामांचा वेग कित्येक पटीने वाढणार आहे. आत्तापर्यंत हे चारही सॉफ्टवेअर वेगवेगळी कामे करीत होती. त्यामुळे माहितीचे संकलन करताना मर्यादा येत होत्या. मात्र, आता या प्रणाली एकमेकांशी संवाद साधणार असून, माहितीचे आदान-प्रदान करणार आहेत. यामुळे डेपोमधील गाड्यांची स्थिती, कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि फाइलचा प्रवास यावर मुख्यालयातूनच डिजिटल नजर ठेवता येईल.
आम्ही पीएमपीला अधिक पारदर्शक आणि तंत्रस्नेही बनवत आहोत. गाड्या डेपोतून वेळेवर सुटणे आणि प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, वेळेवर सेवा देणे, हे आमचे प्राधान्य आहे. या सॉफ्टवेअरच्या नवीन नियोजनामुळे प्रत्येक बसवर मुख्यालयातून लक्ष ठेवता येईल. तसेच, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळेल.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल