

पुणे : पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी 'वेळ नियोजन सप्ताह' जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पीएमपी कार्यालयात बसून नियोजन न करता, आता आगार व्यवस्थापक (डेपो मॅनेजर) स्वतः रस्त्यावर उतरून बसच्या वेळेचे वास्तव जाणून घेणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेनुसार आगार व्यवस्थापक अधिकारी प्रत्यक्ष मार्गावर उतरणार आहेत. प्रत्येक आगाराचे व्यवस्थापक स्वतः विविध बसथांब्यांवर आणि मार्गांवर उपस्थित राहून बसच्या वेळांचे निरीक्षण करत आहेत. हा सप्ताह सोमवार (दि.22) पासून सुरू झाला आहे. आणि त्या अधिकाऱ्यांवर पीएमपी अध्यक्ष स्वत: फिरतीवर राहून लक्ष ठेवणार आहेत.
कोणत्या वेळी प्रवाशांची गर्दी जास्त असते आणि कोणत्या मार्गावर बसची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) वाढवणे आवश्यक आहे, याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. आगार व्यवस्थापक आणि स्टार्टर एकत्रितपणे या अहवालाचा अभ्यास करून बस सोडण्याच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करणार आहेत. तसेच, हा अहवाल पीएमपी अध्यक्ष देवरे यांना देखील सादर केला जाणार आहे.
बस वेळेवर मिळत नसल्याने अनेक प्रवासी रिक्षा किंवा स्वतःच्या खासगी वाहनांचा वापर करतात. यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना पुन्हा सार्वजनिक वाहतुकीकडे वळवण्यासाठी वेळेत बस हेच मुख्य सूत्र प्रशासनाने पकडले आहे. त्यामुळे या सुत्रानुसार पीएमपीचे कामकाज करण्यावर देवरे यांच्याकडून भर दिला जात आहे.
प्रवाशांचा वेळ अत्यंत मौल्यवान आहे. बस वेळेत न मिळाल्यास प्रवाशांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. वेळ नियोजन सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मार्गावरील त्रुटी शोधून त्या दूर करणार आहोत. आगार व्यवस्थापकांनी स्वतः फिल्डवर जाऊन दिलेल्या अहवालामुळे आम्हाला अधिक अचूक नियोजन करता येईल. आमचे उद्दिष्ट फक्त बस चालवणे नाही, तर ती प्रवाशाला हव्या असलेल्या वेळी उपलब्ध करून देणे हे आहे.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल