

पुणे : पुणेकर प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात मार्च 2026 पर्यंत 25 डबल डेकर बस दाखल होणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत असतील, या 25 बस पुण्यातील निवडक पाच मार्गावर प्रति मार्ग पाच बस, अशी प्रवासी सेवा पुरवणार आहेत.
पीएमपी प्रशासनाने यापूर्वी 10 डबल डेकर बस आणण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता तब्बल 25 डबल डेकर बस भाडेतत्वावर खरेदी करण्यात येणार आहेत. या बसेस नवीन वर्षांत म्हणजेच मार्च 2026 पर्यंत पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात आल्यावर पुणेकरांचा प्रवास आणखी आरामदायी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पीएमपी प्रशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यात एका डबल डेकर बसची ट्रायल रन घेतली, ती यशस्वी झाल्यानंतर पीएमपीने 10 डबल डेकर बस खरेदी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याला संचालक मंडळाची मान्यता मिळणे आवश्यक होते. या बस खरेदीचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला होता.
या प्रस्तावामध्ये फक्त 10 ऐवजी 25 बस खरेदी करण्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. त्या 25 डबल डेकर बस भाडेतत्वावर खरेदी करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता पीएमपी प्रशासन तब्बल 25 डबल डेकर बस ताफ्यात आणणार आहे. त्याची तयारी प्रशासकीय पातळीवर युध्दस्तरावर सुरू आहे. निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
पुणेकर प्रवाशांच्या सोयीसाठी डबल डेकर बस आणण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी 10 डबल डेकर बस आणणार होतो. मात्र, आता 25 डबल डेकर बस पुण्यात आणण्यात येणार आहेत. मार्च 2026 पर्यंत या बस पुणेकरांच्या सेवेत असतील. या बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल