

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पीएमपीच्या ताफ्यातील 10 वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झालेल्या डिझेल/सीएनजी बसचे आता इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच, उत्पन्नवाढीसाठी पीएमपीच्या 11 जागांचे व्यापारी तत्त्वावर विकसन करण्यात येणार आहे. पीएमपी ई-डेपो उभारणार असून, तेथे खासगी वाहनचालकांनादेखील वाहनांचे चार्जिंग करता येईल. ओला-उबेरप्रमाणे ई-कॅबसेवा 24 तास सुरू करण्यात येणार आहे, असे पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पीएमपीने सीआयआरटी यांच्यामार्फत अभिप्राय घेऊन ताफ्यातील 10 वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झालेल्या इंधनावरील (डिझेल/सीएनजी) बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता प्रथम 10 बसचे प्रायोगिक तत्त्वावर रूपांतर होणार आहे. याआधी एका बसवर हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे प्रशासनाने इंधनावरील खर्च बचत आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
उत्पन्नवाढीसाठी पीएमपी 11 जागा व्यापारी तत्त्वावर विकसित करणार आहे. या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता मिळाली आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली. यात शिवाजीनगर नतावाडी डेपो, पुणे स्टेशन डेपो, हडपसर डेपो, स्वारगेट सेंट्रल वर्कशॉप, स्वारगेट डेपो, सुतारवाडी डेपो, निगडी सेंट्रल वर्कशॉप, भोसरी, पिंपरी डेपो, निगडी डेपो, भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र या जागा व्यापारी तत्त्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे.
पीएमपी प्रशासन शहरात पीएमपीच्या स्वमालकीच्या ई-कॅब रिक्षाच्या दरात सुरू करणार आहे. ही सेवा 24 तास राहणार असून, यातील काही कॅबवर महिला चालकदेखील असणार आहेत. प्रवाशांना ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकिटाची यात सुविधा असेल. यासंदर्भातील प्रस्तावसुद्धा संचालक मंडळासमोर मांडण्यात आला होता. त्याला पूर्णत: मान्यता मिळालेली नाही. मात्र, पीएमपीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 92 टक्के लोकांनी अशा कॅब शहरात असाव्यात, अशी मागणी केली आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
पीएमपी प्रशासन पीपीपी मॉडेल तत्त्वावर मोक्याच्या सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यामध्ये पीएमपीच्या बससह खासगी वाहनचालकांनादेखील आपली वाहने चार्ज करता येणार आहेत. डेक्कन जिमखाना बसस्थानक, म. गांधी बसस्थानक (पूलगेट), कात्रज सर्पोद्यान, बाणेर सूस रोड, भोसरी बीआरटी टर्मिनल पुलाखालील जागा, अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती-शक्तीसमोर, हिंजवडी फेज 2 या ठिकाणी ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
अगोदरच उत्पन्न कमी झाले असताना आता पीएमपीला 180 कोटींचा फटका बसणार आहे. खासगी बस ठेकेदार यांनी पीएमपीविरोधात दाखल केलेल्या लवाद दाव्यातील निर्णयानुसार ठेकेदारांना 79 कोटी 92 लाख 46 हजार 41 रुपये आणि कोविड तुटीपोटी 99 कोटी 93 लाख 14 हजार 249 रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे पीएमपीला एकूण सुमारे 180 कोटींचा फटका बसणार आहे. पीएमपीने ही रक्कम दोन्ही महापालिकांकडून मागितली असली, तरी हा पीएमपीवर पडलेला मोठा आर्थिक बोजाच असणार आहे.
पीएमपी बसचे आता प्रवाशांना आपल्या मोबाईलवरच लाईव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे. त्यासोबतच बसचे ऑनलाइन तिकीटसुद्धा घेता येणार आहे. याकरिता पीएमपी एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना गुगल पे, फोन पे द्वारे तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. तसेच, बस आता कुठे आली आहे, त्या त्या ठिकाणी जायला कोणती बस आहे, हेदेखील प्रवाशांना मोबाईलवरच कळणार आहे आणि तेही गुगलवरच. यासंदर्भात पीएमपी आणि गुगल यांच्यात करार करण्यात आला आहे.