Stock Market : गुंतवणूकदारांना दिलासा! तीन दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला | पुढारी

Stock Market : गुंतवणूकदारांना दिलासा! तीन दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला

मुंबई; पुढारी ऑनलाईन

सलग तीन दिवसांच्या पडझडीनंतर आज शुक्रवारी शेअर बाजार (Stock Market) सावरत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने (Sensex) ७00 अंकांनी उसळी घेतली. तर निफ्टी (Nifty) २०० अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्स सध्या ५८ हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. तर निफ्टी १७ हजारांवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, टोकियोचा प्रमुख निक्केई निर्देशांक शुक्रवारी सकाळच्या व्यवहारादरम्यान उच्च पातळीवर पोहोचला. याआधीच्या सत्रात त्यात घसरण झाली होती. पण शुक्रवारी त्यात सुधारणा होऊन तो उसळला. हाँगकाँग शेअर बाजाराची सुरुवात देखील चांगली झाली आहे. गेल्या आठवडाभरात हा शेअर बाजार गडगडला होता.

काल गुरुवारी, नकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला होता. काल शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८१ अंकांनी घसरत ५७,२७६ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी १६७ अंकांनी खाली जात १७,११० अंकांवर बंद झाला होता.

भारतीय शेअर बाजारात (Stock Market)  गुरुवारी (दि.२७) हाहाकार उडाला होता. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सकाळच्या सत्रात तब्बल सुमारे १ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टीची (Nifty) ३०० अंकांनी घसरण झाली होती. यामुळे बाजार सुरु होताच पहिल्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांना ३.८ लाख कोटींचा फटका बसला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर लवकरच वाढवण्याचे मिळालेले संकेत आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण झाली असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे होते.

Back to top button