

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या परीक्षेतील हा प्रकार आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविले असल्याचे समोर येत असून, त्याची पडताळणी सुरू आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करीत असताना म्हाडा व त्यानंतर टीईटीच्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
२०१९-२० च्या टीईटी परीक्षेतील पहिल्या पेपरला १ लाख ८८ हजार ६८८ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १० हजार ४८७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर २ साठी १ लाख ५४ हजार ५९६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार १०५ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. हा निकाल १९ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता.
२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत ९ हजार ६७७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. या परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअरचे अश्विनकुमार व इतरांना अटक केली आहे. या परीक्षा मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे. यामध्येही प्राथमिक माहितीनुसार सुमारे अपात्र ५०० परीक्षार्थींचे प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेऊन त्यांना मूळ निकालात घुसवून पात्र असल्याचे दाखविले आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.