

पुणे : प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी पीएमपी प्रशासनाने प्रवासी आणि कामगार यांच्या समस्यांचे थेट निराकरण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे दर शुक्रवारी पीएमपीचे सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी नागरिकांशी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करणार आहेत. पीएमपी अध्यक्षांच्या संकल्पनेतून हा प्रवासीअभिमुख उपक्रम सुरू करण्यात आला आहे.(Latest Pune News)
गेल्या शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर 2025) या उपक्रमाला सुरुवात केली. दर शुक्रवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत पीएमपीच्या मुख्य कार्यालयातील हॉलमध्ये हा थेट संवाद कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, मुख्य वाहतूक अधिकारी सतीश गव्हाणे, मुख्य अभियंता दत्तात्रय तुळपुळे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सेवानिवृत्त पीएमपी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या प्रलंबित समस्या आणि अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
पीएमपी प्रशासन आणि प्रवासी यांच्यात एक विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, हा आमचा मुख्य प्रयत्न आहे. अनेकदा प्रवाशांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या लहान-सहान समस्या केवळ योग्य संवाद न झाल्यामुळे प्रलंबित राहतात. प्रवासी, कर्मचाऱ्यांशी थेट संवाद घडवून आणणाऱ्या उपक्रमामुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल. प्रवाशांच्या सूचनांचा आम्ही गांभीर्याने विचार करू आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडविले जातील. हा उपक्रम पीएमपीच्या सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
पीएमपीची सेवा अधिक प्रवासीअभिमुख व्हावी, प्रवाशांच्या समस्या, सूचना आणि तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहचाव्यात आणि त्यांचे निराकरण व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. अनेकदा प्रवाशांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. त्याचप्रमाणे पीएमपी कर्मचाऱ्यांच्याही अनेक सेवाविषयक समस्या असतात. या दोन्ही घटकांशी थेट संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.