Pmp Bus | पीएमपीच्या 266 बसगाड्या ताफ्यातून कमी होणार; नेमकं कारण काय?

Pmp Bus | पीएमपीच्या 266 बसगाड्या ताफ्यातून कमी होणार; नेमकं कारण काय?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील नुकत्याच 125 बस स्क्रॅप केल्या आहेत आणि लवकरच 141 बस स्क्रॅप करण्यात येणार आहेत. म्हणजेच, अशा एकूण 266 बसगाड्या आता ताफ्यातून कमी होणार आहेत. पुणेकरांना अगोदरच बसगाड्यांचा तुटवडा भासत असताना त्यात आणखी भर पडणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2009 बसगाड्या आहेत. त्यातील 266 कमी झाल्यामुळे पीएमपीकडे 1743 बसगाड्याच राहणार आहेत. पुणेकरांची शहरातील लोकसंख्या लक्षात घेत पीएमपीकडे मार्गावर साडेतीन हजारांपेक्षा बस रस्त्यावर असणे आवश्यक आहे. परंतु, सध्या 1500 च्याच घरात बस दररोज रस्त्यावर प्रवासी सेवा पुरवितात. त्या गाड्या पुणेकर प्रवाशांसाठी अपुर्‍या असून, प्रवाशांना गाड्यांसाठी तासन् तास थांब्यांवर वाट पाहावी लागत आहे. पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढवून आम्हाला उत्तम प्रकारची सुविधा पुरवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

नवीन बस खरेदीचे नियोजन कागदावरच का?

पीएमपी प्रशासन लवकरच 500 बस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यातील 400 भाडेतत्त्वावरील आणि 100 स्व:मालकीच्या असतील, असे नियोजन आहे. परंतु, प्रशासनाने हे फक्त कागदावरच ठेवू नये, लवकरात लवकर या नव्या बस प्रवाशांच्या सेवेत आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

ताफ्यातील 266 गाड्या स्क्रॅप  केल्या जाणार आहेत. 266 पैकी 125 गाड्या आत्तापर्यंत स्क्रॅप झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकर प्रवाशांसाठी गाड्यांची कमतरता भासणार आहे. परंतु, आम्ही आमच्याकडे इंजिन काम व अन्य मोठ्या कामांसाठी आगारात उभ्या असलेल्या जास्तीत जास्त गाड्या नव्या गाड्या येईपर्यंत मार्गावर काढण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुणेकर प्रवाशांना आगामी काळात गाड्या कमी पडणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जातील.

– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

मला कामानिमित्त वाघोली ते मनपा आणि स्वारगेटदरम्यान बसने प्रवास करावा लागतो. मात्र, मला या प्रवासाकरिता बसथांब्यांवर तासन् तास थांबावे लागते.
बराच वेळ वाट पाहूनसुध्दा बस वेळेत उपलब्ध होत नाही. बसची वाट पाहणे, हे नेहमीचेच झाले आहे. कधी वेळेत बस मिळाली, असे कधीच होत नाही.

– सुधीर गायकवाड, प्रवासी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news