काळम्मावाडी, राधानगरीत जूनअखेर राहणार केवळ एक टीएमसी पाणी | पुढारी

काळम्मावाडी, राधानगरीत जूनअखेर राहणार केवळ एक टीएमसी पाणी

अनिल देशमुख

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पापैकी दूधगंगा (काळम्मावाडी) आणि राधानगरी धरणात जूनअखेर केवळ एक टीएमसी (0.96 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. यामुळे एप्रिल, मे महिन्यात चांगला वळीव आणि जूनमध्ये वेळेवर पाऊस सुरू झाला नाही तर मे आणि जून महिन्यातही जिल्ह्याला टंचाईच्या झळा बसतील, अशी शक्यता आहे.

दूधगंगा आणि राधानगरी धरणातून सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. दूधगंगेतील 4 टीएमसी पाणी कर्नाटकला दिले जाते. राधानगरीतील पाण्याचा कोल्हापूर शहराला पुरवठा केला जातो. दूधगंगा धरणावर सहा तालुक्यातील सुमारे 46 हजार 948 हेक्टर तर राधानगरी धरणावर पाच तालुक्यांतील 26 हजार 560 हेक्टर असे दोन धरणांतील पाण्यावर 73 हजार 508 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होते.

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ 56 टक्केच पाऊस झाला. परिणामी शेतीसाठी पाण्यांचे आवर्तन लवकर सुरू केलेे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात घट झाली. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, जूनअखेर आवश्यक पाणीसाठा याचा विचार करून नियोजन केले आहे. कालवा सल्लागार समिती बैठकीत या नियोजनाला मान्यता दिली. यामुळे दूधगंगेत 30 जूनअखेर 0.57 टीएमसी आणि राधानगरीत 0.39 टीएमसी पाणीसाठा राहणार आहे.

जिल्ह्यात काही वर्षांत पाऊस उशिराने दाखल होत आहे. गतवर्षी तर जूनच्या 24 तारखेला मान्सून दाखल झाला. मात्र, जून महिन्यात सरासरीच्या अवघा 25 टक्केच पाऊस झाला. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात चांगला वळीव पाऊस झाला नाही तर एप्रिल आणि मे महिन्यात शेतीसाठी पाण्याची मागणी वाढणार आहे. जूनमध्ये मान्सून वेळेवर सुरू झाला नाही तर जूनमध्येही पिकांसाठी पाण्याची मागणी वाढणार आहे. यामुळे जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

Back to top button