नाशिक (त्र्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात छोटया पक्षांना हाताशी धरत मतविभाजनाचा आटापिटा करत आहे. राज ठाकरे यांनी भाजपबरोबर न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी महाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुजा आणि अभिषेक केला. त्यांच्या समवेत युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,कैलास मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे पौरोहित्य राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज काण्णव यांनी केले. देवदर्शन आटोपल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले, या वृत्ताकडे त्यांचे लक्ष वेघले असता महाराष्ट्र थोर व्यक्तींच्या विचाराने प्रेरित झाला, अशी सूचक टिप्पणी केली. भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात छोटया पक्षांना हाताशी धरत मतविभाजनाचा आटापिटा करत आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांचा मीदेखील चाहता आहे. मात्र त्यांनी महाराष्ट्र धर्मासाठी भाजपबरोबर जाऊ नये. महाराष्ट्र हितासाठी महाशक्तीविरोधात लढले तर त्यांच्याप्रती माझ्यासारख्या युवा वर्गाच्या मनात असलेला आदर आणखी वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिंडोरीच्या जागेसाठी कम्युनिस्ट पक्ष मागणी करत आहेत. त्यांनी देशातील प्रतीगामी विचारांच्या शक्तींना रोखायचे असेल तर मनाचा मोठेपणा दाखवत एकत्र लढा द्यावा लागणार आहे. जे. पी. गावीत कदापी भाजपाबरोबर जाणार नाही अथवा त्यांना मदत होईल, अशी भूमिका घेणार नाहीत असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. नाशिक येथील जागेबाबत कार्यकर्ते आग्रही आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते योग्य तोच निर्णय घेत आहेत, असे मत व्यक्त केले आहे.