कोल्हापूर : टेंबलाई नाका परिसरात राडा

कोल्हापूर : टेंबलाई नाका परिसरात राडा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ताराराणी चौकासह परिसरातील 50 ते 60 जणांच्या शस्त्रधारी जमावाने टेंबलाई नाका उड्डाणपुलासह जामसंडेकर माळ परिसरात सोमवारी सायंकाळी प्रचंड दहशत माजवीत राडा केला. घरांवर तुफानी दगडफेक, दहा वाहनांची तोडफोड करीत धुमाकूळ घातला. दगडफेक, मारहाणीत एकजण जखमी झाला असून, तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा पाचारण करण्यात आला.

राजारामपुरी, शाहूपुरी पोलिस ठाण्यांसह व पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड करण्यात येत आहे. तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दगडफेकीमुळे परिसरातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टपर्‍यांसह हातगाड्याही रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत.

'राजारामपुरी'चे निरीक्षक अनिल तनपुरे, 'शाहूपुरी'चे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिसांनी घरांची झडती घेऊन संशयितांचा शोध सुरू केला आहे. दहशत माजविणार्‍या म्होरक्यासह संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

लहान मुलांतील वादाचे पर्यवसान

ताराराणी चौक आणि टेंबलाईवाडी नाका उड्डाणपूल परिसरातील मुले रुक्मिणीनगर येथील शाळेत शिक्षण घेतात. किरकोळ कारणातून दोन्ही परिसरातील मुलांमध्ये वादावादी झाली होती. परिसरातील काही मंडळींनी त्यांच्यात समझोता घडवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तरीही टेंबलाईवाडी नाका येथील काही तरुणांनी सोमवारी सकाळी शाळेत जाऊन ताराराणी चौकातील मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

संतप्त जमावाची घरांवर चाल; वाहनांना केले टार्गेट

या घटनेमुळे संतप्त झालेल्या 50 ते 60 तरुणांच्या जमावाने दुपारी साडेचारच्या सुमाराला हातात तलवारी, कोयते, एडका, लोखंडी गज, काठ्या घेऊन टेंबलाईवाडी नाका येथील घरांवर चाल केली. परिसरात घुसून जोरदार दगडफेक सुरू केली. खिडक्यांच्या काचा, कौले फोडण्यात आली. परिसरात पार्किंग केलेल्या 5 मोटारी, 4 दुचाकी, एका टेम्पोवरही तुफान दगडफेक करून तोडफोड करण्यात आली.

स्टॉल, टपर्‍यांसह सोडा विक्री गाड्यांचीही तोडफोड

परिसरातील स्टॉल, टपर्‍यांसह सोडा वॉटर विक्रीच्या गाड्यांचेही नुकसान करण्यात आले. शस्त्रधारी जमावाची सुमारे 30 ते 35 मिनिटे दहशत सुरू होती. अनपेक्षित प्रकारामुळे टेंबलाईवाडी नाका उड्डाणपुलासह जामसंडेकर माळ परिसरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांचा सौम्यलाठी हल्ला

शस्त्रधारी जमावाने केलेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अधिकार्‍यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केल्यानंतर जमाव पांगला. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news