

निनाद देशमुख
पुणे: महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रखडलेल्या कामांना गती देण्याचे आश्वासन दिले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, सूस, म्हाळुंगे, बावधन बुद्रुक, लोहगाव-वाघोली, केशवनगर आणि शेवाळवाडी येथील योजना मुदत संपूनही अपूर्ण आहेत. तसेच साडेसतरानळी, मांजरी बुद्रुक, ऊरुळी देवाची, फुरसुंगी आणि भिलारवाडी परिसरातील प्रकल्पही रखडले आहेत. काही ठिकाणी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही.
प्रशासनाच्या मते, जागेच्या उपलब्धतेसंबंधी अडचणी, तांत्रिक बाबी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांमुळे प्रकल्पांना विलंब झाला. मात्र, आता या अडचणी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. संबंधित विभागांनी प्रलंबित कामांचा आढावा घेतला असून, प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला जात आहे.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी प्राधान्याने जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणी आणि वितरण व्यवस्था पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन समन्वयाने प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सांगण्यात आले.