पुणे : विकासकामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेचे सॉफ्टवेअर

पुणे : विकासकामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेचे सॉफ्टवेअर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, भवन, ड्रेनेजसह सर्व अभियांत्रिकी कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 'इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम' सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऑनलाइन बिले सादर होऊन ठेकेदारांना वेळेत कामांचे पैसे मिळतील, असा दावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केला आहे.

एखाद्या रस्त्याचे काम पूर्वी केले असले तरी वर्षभराने त्याच रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविल्या जातात. हे करत असताना संबंधित रस्त्यांच्या नावात बदल केले जात असल्याने लगेच लक्षात येत नाही. रस्ते, पदपथ, ड्रेनेज लाईन, विद्युत पोल अशा कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अथवा मुख्य खात्याकडूनही कामांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असते. बदलणारी वॉर्डरचना, अधिकार्‍यांच्या बदल्या आणि मागील रेकॉर्ड शोधण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे या चुका होत असतात.

फसवणुक टाळण्यासाठी होणार उपयोग

महापालिकेकडून दरवर्षी हजारो कामांच्या निविदा काढल्या जात असल्याने या त्रुटी राहतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सीएसआरच्या माध्यमातून जीआयएस बेस्ड 'इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम' हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये विभागवार मागील कामांच्या नोंदी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. तसेच अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या बजेट कोडनुसार संबंधित कामांसाठी उपलब्ध करून दिलेेला निधीही अपलोड करण्यात येत आहे. जे काम करायचे आहे त्याचा जीआयएस मॅप हा टॅग करण्याची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये असेल. तसेच प्रत्येक कामासाठीचे निश्चित केलेले डीएसआर रेटही यामध्ये अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे कामांचे ऑनलाईन एस्टिमेट करणे अधिक सोपे होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे लॉकिंग करून त्या कामाचे पैसे अन्य कामासाठी वळविता येणार नाहीत.

यासोबतच बिलिंगसाठी प्रशासनाने 'सॅप' सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम ही सॅपसोबत जोडण्यात येणार आहे. बिलिंगसाठी ठेकेदारांना त्यांचा लॉगीन आयडी देण्यात येईल. यामुळे बिलांची फाईल सबमिट करण्यासाठी विविध टेबलवर फिरावे लागणार नाही. परिणामी लवकरात लवकर बिल अदा करण्याची प्रक्रिया सोपी होईल, असा दावा विक्रम कुमार यांनी केला आहे.

जीआयएस बेस्ड हे सॉफ्टवेअर 'सीएसआर'च्या माध्यमातून तयार करून घेण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे त्याचे संचालन सॉफ्टवेअर विकसकाकडूनच केले जाणार आहे. हे सॉफ्टवेअर वापराबाबत सर्वच विभागातील अभियंत्यांना 4 ते 8 एप्रिलदरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामांपासून या सॉफ्टवेअरचा वापर सुरू होईल. सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यावर जर काही त्रुटी आढळल्या तर त्या दूर करण्यात येतील.

                                               – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.

महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी कामे पाहण्यासाठी नागरिकांनाही या सॉफ्टवेअरमध्ये अ‍ॅक्सेस देण्यात येणार आहे. नागरिकांना त्यांची मते मांडण्याची व 'फिड बॅक' मिळण्याची सोयही सॉफ्टवेअरमध्ये करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किमान 90 टक्के कामांतील पुनरावृत्ती टळणार असून सार्वत्रिक विकासास मदत होईल.

                                                             – विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news