पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे मिळकतकराची थकबाकी असलेल्या 1400 मिळकती महापालिकेने सील केल्या असून, या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील 200 मिळकतींचा लिलाव होणार असून, ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मिळकतकर हा आहे. महापालिकेला मागील वर्षी सप्टेबर महिन्यापर्यंत सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी महापालिकेला 1 हजार 400 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, महापालिकेच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा सुमारे 600 कोटी रुपयांनी कमी उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महापालिकेकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.