Kirit Somaiya : सोमय्यांना आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरलची धमकी | पुढारी

Kirit Somaiya : सोमय्यांना आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरलची धमकी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  धमकी देत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारीत केल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीवर कारवाई झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता सोमय्या यांना अशीच आणखी एक अश्लिल चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमय्या यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी अज्ञात ईमेलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमय्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांची सचिव मुलगी कार्यालयीन कामकाजाचे मेल तपासत असताना तिला ऋषिकेश शुक्ला नावाच्या ईमेल आयडीवरुन एक मेल आलेला दिसला. या मेलमध्ये कथित आक्षेपार्ह अश्लील चित्रफितीचा उल्लेख करत हा फक्त प्रीव्ह्यू आहे. संपूर्ण चित्रपट अद्याप बाकी आहे. संपूर्ण चित्रपट व्हायरल करण्याची धमकी देऊन तसे न करण्यासाठी ५० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. या तरुणीने मेलची माहिती सोमय्या यांना दिली. त्यानंतर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात जात याबाबत तक्रार दिली आहे

सोमय्या यांच्या संदर्भातील कथित अश्लील व आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात संबंधित मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. यावरून वातावरण तापले असतानाच सोमय्यांकडून ईमेलच्या माध्यमातून खंडणी मागितली गेल्याने खळबळ उडाली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने जुलै महिन्यात एक आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारीत करुन खोटा रिपोर्ट दिला होता. याबाबत सायबर पोलीस व गृहमंत्रालयाकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे आपल्यावर दबाव आणण्यासाठी चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-किरीट सोमय्या, माजी खासदार, भाजप

 

Back to top button