

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जगाला कुशल कामगारांचा पुरवठा करण्याची तयारी भारत सरकारकडून जोमात सुरू आहे. दरवर्षी 11 लाख तरुणांना आयटीआयसह कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून, त्याला जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षणाची जोड देण्याच्या योजनेला आता गती मिळालेली आहे.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने, भविष्यात जगभरात ठिकठिकाणी निर्माण होणार असलेल्या कुशल कामगारांच्या आवश्यकतांचे मूल्यमापन सुरू केलेले आहे. प्रत्येक कौशल्याचे त्यानुसार प्रमाणीकरण केले जाईल. त्या अनुषंगाने सध्याच्या प्रशिक्षण पद्धतीत आवश्यक ते बदल केले जातील. तरुणांना परदेशातही रोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकतील, असे हे बदल असतील.
18 ते 59 वयोगटातील 87 कोटी कामगार देशात आहेत. 56 टक्के (त्यापैकी) लोकांनाच नियमित रोजगार उपलब्ध होतो. 4 कोटी लोकांची नोंदणी सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या (एका महिन्यात) स्किल इंडिया डिजिटल पोर्टलवर झालेली
आहे. 70 कोटी लोकांना पोर्टलशी जोडण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.