

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा वेग आता आणखी वाढणार आहे. मोठ्या अनधिकृत इमारतींवर कारवाईसाठी महापालिकेने चार कोटी किमतीचे अजस्त्र मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशिन खरेदी केले आहे.
पालिका यापूर्वी ही मशिन भाडेतत्त्वावर घेत होती. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या मशिनचे गुरुवारी (दि. 12) लोकार्पण झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठे आहे. प्रामुख्याने उपनगरांमध्ये दोन ते तीन गुंठ्यांमध्ये पाच ते सहा मजली अनधिकृत इमारती बांधल्या जातात. या अशा इमारतींवर कारवाईसाठी महापालिकेला मुंबई किंवा ठाण्यातून भाडेतत्वावर जॉ क्रशन मशिन आणावे लागत होते. त्यासाठी वर्षाला किमान दोन कोटी रुपयांचा खर्च करावा लागत होता. तसेच अनेकदा कारवाईसाठी हे मशिन वेळेत मिळत नसल्याने कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे पालिकेनेच हे मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता पालिकेचे स्वत:चे मशिन आल्याने मोठ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा वेग वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.