हिंगोली : पाणी पिताना पूर्णा नदीत बुडून सख्ख्या बहिणभावाचा करुण अंत | पुढारी

हिंगोली : पाणी पिताना पूर्णा नदीत बुडून सख्ख्या बहिणभावाचा करुण अंत

सेनगाव ; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारामध्ये पूर्णा नदीत बुडून सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत शेतात गेल्यानंतर नदी पात्रात पाणी पिताना त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) घडली. बहिणभावाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बोडखा येथील गुलाब अंकुश राठोड हे गुरुवारी सकाळी पूर्णा नदीच्या पात्रापलीकडे असलेल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा गोपाल राठोड (वय १०) व मुलगी विशाखा राठोड (वय ७) हे दोघेही सोबत होते. दरम्यान, गुलाब शेंगा काढण्यात व्यस्त असताना गोपाल व विशाखा पूर्णा नदीच्या पात्राकडे गेले.

यावेळी नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यातील पाणी पीत असताना दोघेही पाय घसरून पाण्यात पडले. मात्र, त्या परिसरात कोणी नसल्याने गोपाल यांनी आरडाओरडा करून देखील कोणालाही आवाज ऐकू आला नाही. दुपारी चारच्या सुमारास दोन्ही मुले शेतात नसल्याने गुलाब राठोड व इतर शेतकर्‍यांनी त्यांचा शोध सुरू केला.

पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाहणी केली असता खड्ड्यातील पाण्यात विशाखाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गोपालचा शोध सुरू करण्यात आला. सायंकाळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झाली नव्हती.

दरम्यान, गुलाब राठोड यांना गोपाल व विशाखा ही दोन अपत्ये होती. गोपाल हा इयत्ता पाचवी वर्गात तर विशाखा ही इयत्ता दुसरी वर्गात शिक्षण घेत होती. गुलाब यांची पत्नी गंभीर आजारी आहे. उदरनिर्वाहासाठी मजुरी करावी लागते. त्यामुळे ते पत्नीला घरी ठेवून मुलांसोबत शेतात कामाला गेले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button