

PMC Action at Rameshwaram Cafe Pune: पुण्यातील विमननगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. बेंगळुरूमधील लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाणारे हे कॅफे पुण्यात सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. मात्र दुकानाबाहेरील अतिक्रमण आणि सार्वजनिक जागेचा वापर केल्यामुळे महापालिकेने कारवाई केली आहे.
बेंगळुरूमध्ये प्रसिद्ध असलेले रामेश्वरम कॅफे डिसेंबर 2025 मध्ये पुण्यातील विमननगरमध्ये सुरू झाले. दक्षिण भारतीय पारंपरिक चवीसाठी ओळखले जाणारे हे कॅफे सुरू झाल्यानंतर पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत कॅफेबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या.
कॅफे बाहेरील सार्वजनिक जागेचा वापर होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. पाहणीनंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने अतिक्रमण हटवण्यात आले आहे.
रामेश्वरम कॅफे हे आपल्या खास दक्षिण भारतीय पदार्थांसाठी ओळखले जाते. विशेषतः तुपात बनवलेले खुसखुशीत डोसे, मऊ इडली आणि पारंपरिक फिल्टर कॉफी यामुळे हे कॅफे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यामुळे अनेक खाद्यप्रेमी खास या कॅफेला भेट देण्यासाठी येत असल्याचे दिसून आले.
या कॅफेची स्थापना राघवेंद्र राव आणि दिव्या राघवेंद्र राव यांनी केली आहे. दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा अस्सल स्वाद जगभर पोहोचवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे कॅफेच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.
पुण्यातील या कॅफेवर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. काहींनी महापालिकेच्या कारवाईचे समर्थन केले, तर काहींनी लोकप्रिय ठिकाणांवर गर्दी होणे स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले.