

बावडा: उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सांडव्यातून तसेच विद्युत निर्मतीि गृहातून पिण्याच्या पाणी योजनांसाठी सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणामध्ये 63.01 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
उजनी धरणातून 20 फेबुवारीपासून भीमा नदीपात्रामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांसाठी सांडव्यामधून व पॉवरहाऊसमधून पाणी सोडण्यात आले. विसर्गात हळूहळू वाढ करून तो 5000 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील विसर्ग हळूहळू कमी करून 2 मार्चपासून तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 28 फेबुवारी रोजी रात्री बंद करण्यात आला आहे. धरणातून वीजनिर्मतीिसाठी सोडण्यात येत असलेला 1600 क्यूसेक विसर्ग 2 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.
पुणे, सोलापूर,अहिल्यानगर या जिल्ह्यांना वरदायी असलेल्या उजनी धरणामध्ये मंगळवारी (दि. 3 मार्च) पाणीसाठा हा 97.42 टीएमसी एवढा होता. उपयुक्त पाणीसाठा हा 33.76 टीएमसी आहे. तसेच, उजनी धरणाच्या पाणीसाठ्यातून सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी 280 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 100 क्युसेक, बोगद्यामधून 100 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुख्य कालव्यातील विसर्ग गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आला आहे.
शेटफळ तलावाचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन दि. 5 मार्चपासून सोडण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना समान न्यायाच्या तत्त्वावर पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बेकायदेशीर सायफनधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने सोमवारी (दि. 2) दिला.
निमगाव केतकी येथील निरा डावा कालवा पाटबंधारे उपविभाग कार्यालयात उपकार्यकारी अधिकारी दि. बा. एकतपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, कार्याध्यक्ष महादेवराव घाडगे, सहसचिव विशाल घाडगे उपस्थित होते. समितीच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी बावडा पाटबंधारे शाखेचे शाखा अभियंता विक्रम गायकवाड, कालवा निरीक्षक आर. व्ही. गेंड व जी. ए. पंडित उपस्थित होते.
बैठकीत शेटफळ हवेली तलावाचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी करण्यात आली. तलावातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन आगामी तीन आवर्तनांचे नियोजन करावे, शेटफळ कालव्यावरील दारे क्रमांक 1 ते 23 यांची दुरुस्ती करून तलावाचे पाणी नऊ पाणीवापर सहकारी संस्थांकडे देण्यात यावे, दारे क्र. 19 अ व 19 ब येथील जमिनीचा चढ विचारात घेऊन पाइप टाकण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवावा, शेटफळ तलावातून पाणी उपसा करण्याचा परवाना नसलेल्या शेतकऱ्यांचे वीजजोड तोडण्यासाठी वीज मंडळास पत्र द्यावे.
तसेच बावडा ग््राामपंचायतीच्या मागणीनुसार खंडोबानगर तलावात पाणी सोडावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांना मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पंडितराव पाटील व कार्याध्यक्ष महादेवराव घाडगे यांनी दिली.
पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
शेटफळ तलावावरील लाभार्थी शेतकऱ्यांनी मार्चअखेरपर्यंतची पाणीपट्टी जलसंपदा विभागाच्या वकीलवस्ती येथील कार्यालयात जाऊन भरावी, असे आवाहन उपकार्यकारी अधिकारी दि. बा. एकतपुरे यांनी केले.