

पिंपरी : वारंवार सूचना देऊनही स्थानिक पोलिस तक्रारदारांशी हद्दीचा वाद घालत असल्याचे महासंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता हद्दीचा वाद घालणार्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील सर्व घटक प्रमुखांना याबाबतचे आदेश दिले आहेत. गुन्हा घडल्यानंतर नागरिक नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न करतात; मात्र अनेकदा तेथील पोलिस आपली हद्द नसल्याचे सांगून नागरिकांना टोलावून लावतात. नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता पोलिस त्यांच्याशी वाद घालतात.
प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता रीतसर तक्रार दाखल करून घेणे अपेक्षित आहे. विशेषतः महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. पोलिसांबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे महासंचालक कार्यालयाकडून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. हद्दीचा वाद घालणार्या पोलिसांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिस गुन्हा नोंदवून न घेता हद्दीचा वाद घालतात. घडलेला गुन्हा आमच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसून दुसर्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, अशा प्रकारची उत्तरे पोलिसांकडून दिली जातात. याबाबत पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात चर्चा झाली. याची दखल घेत महासंचालक कार्यालयाने हद्दीचा वाद घालणार्या पोलिसांवर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
महिला तक्रारदार ज्या पोलिस ठाण्यात प्रथम फिर्याद देतील तेथील पोलिसांनी आपल्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडलेला नसला तरीही, शून्य क्रमांकाने गुन्ह्याची नोंद करणे बंधनकारक आहे. त्यानंतर सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्यास हस्तांतरित करणे गरजेचे आहे; मात्र शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने याचे प्रमाण कमी आहे.
तक्रारदारांशी हद्दीचा वाद घालू नये, याबाबत महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना वेळोवेळी आदेशित करण्यात आले होते; मात्र तरीही सूचनांचे पालन होत नसल्याचे काही घटनांमधून निदर्शनास आल्याने महासंचालक कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
ठाण्यात आलेल्या तक्रारदारांना सौजन्याची वागणूक द्यावी. तसेच, हद्दीचा वाद न घालता गुन्हा दाखल करून तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करावा, याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वेळोवेळी आदेशीत केले आहे. नुकतेच महासंचालक कार्यालयाकडूनदेखील याबाबत एक पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार, प्रभारी अधिकारी यांना पुन्हा एकदा सूचना देण्यात आल्या आहेत.
– सतीश माने,
सहाय्यक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड.
हेही वाचा