आकुर्डी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी येथील दवाखान्यात आरोग्यसेवा बजावत असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी शासन सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी 3 नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. 25 ऑक्टोबरपासून तसे हे आंदोलन राज्यभर सुरू झाले आहे. त्यात आता आकुर्डी येथील वैद्यकीय कर्मचार्यांनी सहभाग घेतला. या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.
क्षयरोग विभागात गेली 20 वर्षांपासून विविध पदांवर एकूण 46 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये क्षयरोगसारख्या अतिसंसर्गजन्य रोगामध्ये प्रत्यक्षरित्या कामकाज करत असताना शासनाकडून त्यांना अत्यंत तुटपूंजे मानधन देण्यात येते. बेमुदत आंदोलनानुसार बिनशर्त समायोजन झालेच पाहिजे व जोपर्यंत समायोजन होत नाही, तोपर्यंत 'समान काम समान वेतन' मिळण्याबाबत लेखी स्वरूपात सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत 'काम बंद' आंदोलन चालू ठेवण्याचे निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांनी एकच नारा कायम करा… अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधून घेतले.
महापालिका आरोग्य कर्मचार्यांना रुग्णांचे टार्गेट महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांना वर्षाचे रुग्ण टार्गेट 3100 देण्यात आले आहे. त्यापैकी 2368 रुग्ण आहेत. कोवीड काळात त्यांनी जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता शंभर टक्के क्षयरोग विभागात आपले योगदान दिले आहे. कोवीड काळात बर्याच कर्मचार्यांना कोवीडची लागणदेखील झाली होती. तरीही न डगमगता त्यांनी आपले काम चोखपणे केले.
हेही वाचा