संगोपन : पालक मीटिंगचे महत्त्व ओळखा | पुढारी

संगोपन : पालक मीटिंगचे महत्त्व ओळखा

राधिका बिवलकर

अलीकडील काळात बहुतांश शाळांमध्ये शिक्षक आणि पालकांची मीटिंग असते; पण काही पालकांना ही पेरेंट टीचर मीटिंग म्हणजे आठवड्याची सुट्टी खराब करण्यासाठी असते असे वाटत असते. मात्र, असा विचार अतिशय चुकीचा आहे. अनेक पालकांना वाटत असते की, आपले मूल शाळेत जाऊन अतिशय चांगले राहते आणि व्यवस्थित अभ्यास करते. त्यामुळे पुन्हा त्यासाठी मीटिंगला जाण्याची काय गरज आहे; पण सत्य परिस्थिती शाळेत गेल्यानंतर शिक्षकांशी भेट घेऊनच समजू शकते. यामुळे आपल्याला आपल्या मुलाच्या प्रत्येक प्रगतीबाबत जाणून घेता येते. शिवाय त्याच्या कमकुवत बाजूंची सुद्धा माहिती होते. म्हणूनच पेरेंट टीचर मीटिंगला पालकांनी अवश्य जावे.

मुलाच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा नाही म्हणजे आपण मुलाकडे लक्ष द्यायचे नाही, असा मुळीच अर्थ घेऊ नये. आपले मूल वर्गात चांगले सादरीकरण करत असेल तरीही त्याच्या शिक्षकांना भेटून त्यांच्याशी बोलायलाच हवे. आहे त्या अभ्यासात, वर्तणुकीत आणखी सुधारणा तो कशा पद्धतीने करू शकतो, याबाबतची माहिती आपल्याला त्यातून मिळू शकते. मुले शाळेत कोणकोणत्या गोष्टी करतात, शाळेत त्यांचे कोणकोणते उपक्रम चालतात हे प्रत्येक आई-वडिलांना माहीत असले पाहिजे. कदाचित मूल त्याच्या टेस्ट पेपरवर स्वतःच सही करत असण्याची शक्यताही असते.

आपले मूल वर्गातील इतर मुलांशी आणि शिक्षकांशी मिळून-मिसळून बोलतेे का? की गप्प राहून कोपर्‍यात बसून राहते, या सर्व आवश्यक प्रश्नांची उत्तरे मीटिंगला गेल्यानंतरच मिळू शकतात. या व्यतिरिक्त शिक्षकांबद्दल काही तक्रार असेल तर तीसुद्धा आपण या बैठकीदरम्यान सुसंवादाने सोडवू शकतो.

शिक्षक मुलांकडे नीट लक्ष देत नसतील किंवा त्याच्या वह्या व्यवस्थित तपासत नसतील तर मीटिंगमध्ये याबाबत आवाज उठवता येतो. इतकेच नाही तर या मीटिंगमध्ये आपल्या मुलांच्या मित्रांच्या पालकांशीसुद्धा भेट होते. त्यांच्याशी संवाद होतो. यातून आपण या पालकांद्वारे पालकत्वाचे काही मोलाचे सल्ले मिळू शकतात. तसेच इतर मुलांच्या तुलनेत आपले मूल नेमके कुठे आहे याचाही अंदाज लावता येऊ शकतो.

आपल्या मुलाच्या भविष्यासाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे वेळ नाही, अशा सबबी सांगणे सोडून द्यावे. यामुळे आपण केवळ स्वतःलाच फसवत नाही तर मुलांनाही फसवत असतो हे लक्षात घ्यावे. आई-वडील या दोघांपैकी एकाला वेळ नसेल तर दुसर्‍याने तरी वेळ काढून या मिटिंगला जाणे आवश्यक आहे. मुलाच्या भविष्याच्या द़ृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी मानून याकडे बघावे.

Back to top button