

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण आणि कागदपत्रांच्या तपासणीत पात्र ठरलेल्या एकूण 387 उमेदवारांना नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अंतिम निकाल जाहीर करून त्यांना पदावर रूजू केले जाणार आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय बनलेली महापालिका नोकरभरती प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली आहे.
पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक बुधवारी (दि.29) पार पडली. या बैठकीत त्या 387 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. पालिकेच्या विविध 11 पदांसाठीच्या 35 जागांसाठी मे महिन्यात दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात 85 हजार 387 पैकी 55 हजार जणांनी परीक्षा दिली. त्याचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर झाला तर उर्वरित 4 पदांच्या 353 जागांसाठी 47 हजार 553 पैकी 30 हजार 581 जणांनी परीक्षा दिली. त्याचा निकाल 30 ऑगस्ट जाहीर करण्यात आला.
पात्र सर्व 387 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून, या पडताळणीत उमेदवारांनी सादर केलेली प्रमाणपत्रे शासनमान्य संस्थेची आहेत की नाही, हे तपासण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांत पात्र उमेदवारांची नावे दिवसांत पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महापालिका सेवेत पदानुसार नियुक्त करून घेण्याची कार्यवाहीदेखील सुरू केली जाईल. त्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेमुळे अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांवर पालिकेला मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
नोकरभरतीसाठी परीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी या दोन प्रक्रिया पार पडल्या आहेत. आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत पात्र उमेदवारांची निवड करण्यास मान्यता मिळाली आहे. अंतिम निकाल दोन ते तीन दिवसांत जाहीर करून या उमेदवारांना 15 दिवसांत रुजू करून घेणार असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा