पिंपरी-चिंचवड आगाराला दिवाळी भेट; मिळाले 26 लाख रुपयांचे उत्पन्न | पुढारी

पिंपरी-चिंचवड आगाराला दिवाळी भेट; मिळाले 26 लाख रुपयांचे उत्पन्न

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड एसटी आगाराला दिवाळीमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या माध्यमातून एकूण 25 लाख 96 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. बसमध्ये जागा पकडण्यासाठी कसरत नको म्हणून ऑनलाइन तिकीट काढण्यास प्रवाशांनी अधिक पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, एकाच वेळी गावी जाणार्‍यांची संख्या अधिक असल्याने एसटी वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. यामध्ये कुटुंबीयांना प्रवासात नेताना गर्दीचा सामना करावा लागतो. या त्रासापासून वाचण्यासाठी परिवहन महामंडळाने ऑनलाईनची सोय केली आहे. त्यामुळे या सेवेचा दिवाळीमध्ये प्रवाशांनी अधिक लाभ घेतला.

ऑनलाईद्वारे घेता येतो सवलतीचा लाभ

‘एमएसआरटीसी’च्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुकिंगची सुविधा 24 तास उपलब्ध आहे. एसटीच्या वेगवेगळ्या सवलतींचा लाभ घेणार्‍या प्रवाशांना ऑनलाईनद्वारे तिकीट आरक्षित करता येते.

ऑनलाईन तिकिटांसाठी खिडकीची सोय

बर्‍याच प्रवाशांना मोबाइल किंवा संगणकावरून ऑनलाइन तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे बसस्थानकात तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र खिडकी आहे. दिवाळीच्या कालावधीत येथे तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.

  • पिंपरी-चिंचवड एसटी आगाराला दिवाळीमध्ये एकूण 80 लाख रुपयांची भेट प्रवाशांनी तिकिटांच्या माध्यमातून दिली आहे. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात रोजगार आणि शिक्षणानिमित्त देशाच्या कानाकोपर्‍यातील नागरिक वास्तव्य करीत असून, राज्याच्या बर्‍याच जिल्ह्यातील लोक शहरात स्थायिक झाले आहेत.
  • आपल्या कुटुंबीयांसमवेत एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करण्यासाठी नागरिकांची पावले गावाकडे वळतात. या नागरिकांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) दरवर्षी ज्यादा गाड्यांची सोय करते. सुरक्षितता आणि अल्प दरामुळे प्रवाशांची पसंती एसटीलाच असते. त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असते.
    पुणे विभागाचे उत्पन्न
    ? 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आगारातून 86 लाख सात हजार 874 रुपये उत्पन्न मिळवले.

हेही वाचा

Back to top button