Pune News : कात्रजकडून गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात | पुढारी

Pune News : कात्रजकडून गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीने 1 डिसेंबरपासून गायीच्या दूधाच्या विक्री दरात प्रति लिटरला दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूधाचा दर आता 55 वरुन 53 रुपये करण्यात आला असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले. या निर्णयामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक 24 नोव्हेंबर रोजी संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच कमी स्निग्ध व जास्त प्रोटीन असलेले गायीचे दूध 250 मिलिच्या पॅकिंगमध्ये ग्राहकांना 12 रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. कात्रज दूध हे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून संघाकडून नेहमीच स्वच्छ, ताजे व भेसळविरहित दूधाचा पुरवठा केला जातो. कात्रजचे दूध, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मिठाई तसेच आईस्क्रिम आदी उपपदार्थही बाजारात ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध आहेत. संघाने याच बरोबर ज्या दूध संस्था कात्रज पशुखाद्याची दूधाच्या प्रमाणात खरेदी करतील, अशा दूध संस्थांच्या दुधाची खरेदी प्रति लिटरला एक रुपया दराने वाढवून देण्याचा निर्णयही झाल्याचे लिमये यांनी सांगितले.

अन्य दूध ब्रॅण्डधारक दर कधी कमी करणार?

राज्यात सद्यस्थितीत गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला 34 वरुन घसरुन 26 ते 27 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर विक्रीचे दर प्रति लिटरला 55 रुपयांपर्यंत आहेत. याचाच अर्थ खरेदी आणि विक्रीमध्ये तब्बल 26 ते 27 रुपयांचा फरक आहे. हा फरक कमी करण्यासाठी कोणतेही सांघिक प्रयत्न दुग्ध वर्तुळात होत नाहीत. या पार्श्वभुमीवर कात्रज संघाने गायीच्या दूधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी कपात करुन ग्राहकांना किंचित दिलासा दिला आहे. मग आता अन्य सहकारी संघ व खाजगी डेअर्‍या त्यांच्या दूध ब्रॅण्डचे विक्री दर कमी करुन ग्राहकांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 संघाचे रोजचे दूध संकलन सध्या दोन लाख लिटरवर पोहोचले आहे. नेहमीच्या तुलनेत संघाकडे सुमारे 75 ते 80 हजार लिटरइतके अतिरिक्त दूध होत आहे. दुधाचे खरेदी दर उतरल्यामुळे विक्री दरात दोन रुपयांनी कपात करुन ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कात्रजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीस ग्राहकांनी पसंती दयावी.

– भगवान पासलकर , अध्यक्ष, कात्रज दूध संघ,पुणे.

हेही वाचा

Back to top button