Pimpri News : पोलिस ऑन ड्युटी 24 तास | पुढारी

Pimpri News : पोलिस ऑन ड्युटी 24 तास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली असून, याअंतर्गत आता शहरातील महत्त्वाच्या सुमारे 167 चौकांत 24 तास वाहनांसह पोलिस नियुक्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चौबे यांनी दिले आहेत. याशिवाय, सहायक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त हेदेखील या चौकांमध्ये गस्त घालणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी दिली.

चौकांमध्ये नियुक्त केलेल्या प्रत्येक पोलिस वाहनांमध्ये चालक, एक पोलिस कर्मचारी आणि एक अधिकारी आदींचा समावेश आहे. तसेच, वाहनांमध्ये वायरलेस सेटही बसविण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या प्रत्येक ठिकाणी हे वाहन दोन तास थांबून राहत असून, पोलिस उपायुक्त यांच्याकडून दर चार तासांनी आपल्या परिमंडळातील निश्चित ठिकाणांवरील वाहनांची माहिती संकलित केली जात आहे.

ग्रामीण पट्ट्यातही वर्दळ वाढविण्याचा प्रयत्न

ग्रामीण भागातील वाहनांची ठिकाणे निश्चित करताना चाकण, महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहूरोड, शिरगाव येथील दूरवरच्या ठिकाणांचादेखील समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारांवरदेखील कायद्याचा वचक राहण्यास मदत होणार आहे.

दर दोन तासांनी बदलणार ड्युटी

शहरातील प्रमुख बाजारपेठ, चौक, धार्मिक स्थळे, आंदोलनस्थळे, मिश्र लोकवस्ती, ग्रामीण भागातील लांबची ठिकाणे, आयटी पार्क, एमआयडीसी, ट्रान्स्पोर्ट नगर, शाळा-महाविद्यालये, वर्दळीची ठिकाणे अशा परिसरातील सुमारे 167 चौकांवर सध्या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 12 आणि रात्री 12 ते सकाळी 8 या पद्धतीने पोलिस कर्मचारी तैनात राहतील. निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्येक 2 तासांनी पोलिस वाहन आणि अधिकारी कर्मचारी बदलले जाणार आहेत. यामुळे आपोआपच परिसरात पोलिसांची वर्दळ वाढणार आहे.

ही ठिकाणे निश्चित

विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांकडून त्यांच्या हद्दीत कोणत्या ठिकाणी वाहन तैनात करायचे, याबाबत अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार, शहरातील तीनही पोलिस उपायुक्त (परिमंडळ) यांच्या वतीने आढावा घेण्यात आला असून, उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी शहरातील 167 ठिकाणे या उपक्रमासाठी निश्चित केली आहेत.

तात्काळ मदत मिळणे होईल शक्य

नियंत्रण कक्षाकडून एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास चौकाचौकांत पोलिस कर्मचारी तैनात असल्याने संबंधित ठिकाणी पोलिस तातडीने पोहोचतील. परिणामी, नागरिकांना या उपक्रमाचा चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चौकांमध्ये सहायक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त हेदेखील गस्त घालणार असून, याठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे वाहनदेखील उभे राहणार आहे. स्वतः पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहून नागरिकांना वेळेवर मदत उपलब्ध करून देणार आहेत. संपूर्ण शहरात पोलिस गस्त अधिक प्रभावी राहण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

– सतीश माने,
सहाय्यक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड.

पोलिस ठाणे आणि गस्तीची ठिकाणे..

  •  पिंपरी – 9
  •  भोसरी – 9
  •  चिंचवड – 4
  •  निगडी – 9
  •  सांगवी – 7
  •  वाकड – 6
  • हिंजवडी – 5
  • रावेत – 3
  •  देहूरोड – 14
  •  तळेगाव दाभाडे – 15
  • तळेगाव एमआयडीसी – 7
  • शिरगाव – 8
  • भोसरी एमआयडीसी – 13
  •  दिघी – 8
  •  चिखली – 8
  •  चाकण – 14
  •  म्हाळुंगे एमआयडीसी – 14
  •  आळंदी – 14

हेही वाचा

Back to top button