पिंपरी : तळवडेतील कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्या महिलांच्या नातेवाइकांनी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शुक्रवारी (दि. 8) धाव घेत आक्रोश केला. घटनेत मृतदेह जळाले असल्याने मृतांची ओळख पटत नव्हती. जखमी रुग्णांना प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यामध्ये आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीचे नाव नाही म्हणजे ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली असावी, हा धक्का बसून संयमाचा बांध सुटल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.
आपली पत्नी जखमी रुग्णांमध्ये दिसत नाही. कदाचित तिचे निधन झाले असावे, या शक्यतेने अभय कुमार हे वायसीएम रुग्णालयातील शवागाराच्या येथे आले होते. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. मात्र, त्यांना मृतदेहाची ओळख पटली नाही. पत्नी दिसत नसल्याने ते रडू लागले. अभय कुमार म्हणाले की, सकाळीच नऊला पत्नीला कामावर सोडले होते. पत्नी चार ते पाच हजार रुपये पगारावर चार महिन्यांपासून तळवडेतील कंपनीत काम करत होती. जिथे ती काम करते त्या कंपनीला आग लागल्याचे दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान समजले. त्यानंतर आम्ही धावतच घटनास्थळी पोहचलो. तेथून वायसीएम रुग्णालय गाठले. जखमींमध्ये पत्नी नसल्याने शवागार गाठले. मात्र, चेहरा जळाल्याने पत्नीची ओळख पटू शकली नाही.
तळवडेतील कंपनीत काम करणारी आपली बहीण कामावरून घरी परतली नाही.
यामुळे तिचा शोध घेत आलेल्या महिलेने जखमींमध्ये आपली बहीण आहे का, याची वायसीएममध्ये माहिती घेतली. मात्र, तिथे बहीण नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शवागार गाठले. मात्र, तिथेही बहिणीची ओळख न पटल्यानंतर बहिणीचे
काय झाले, यामुळे तिला रडू आवरले नाही.
मृत्यू पावलेल्या सहा महिलांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना वायसीएम रुग्णालयात बोलावून डीएनए चाचणी केली जात आहे. पुण्यातील रिजनल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (न्यायवैद्यक प्रयोगशाळा) येथे डीएनए चाचणीसाठी मृतांच्या शरीरातील बोनमॅरो, रक्त यापैकी न जळालेला भाग पाठविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांपैकी आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी अशा नात्यातील व्यक्तीची डीएनए चाचणी केली जाणार आहे. रुग्णालयात तीन नातेवाईक येऊन गेले. मात्र त्यातील एकानेही मृताची ओळख पटविण्यास नकार दिला. दोन महिलांच्या कानात कर्णफुले आहेत. दोन महिलांच्या हातात पिवळ्या धातूच्या तर, 2 महिलांच्या हातात काचेच्या बांगड्या आहेत.
आगीच्या दुर्घटनेत सहा महिला मृत्यू पावल्या, तर आठ जखमी आहेत. यापैकी सुमन गोदडे या जखमी असून, त्यांना उपचारासाठी ससूनमध्ये हलविण्यात आले. घटनेनंतर सुमनने आपल्या भावाला फोन लावून माहिती दिली व घटनेमुळे भयभीत झाल्याने तिने मला बरं वाटत नाही आहे. तू लवकर मला भेटायला रुग्णालयात ये. असा फोन आल्याची माहिती सुमन यांचा भाऊ गणेशने दिली. सुमन यांची मुलगी राधा ही तळवडेतील कारखाण्यात काम करीत होती.
हेही वाचा