लंडन : रुबिक्स क्यूब सोडवण्याबाबत अनेक विक्रम आजपर्यंत घडलेले आहेत. केवळ वेगाने हे कोडे सोडवण्याबाबतच नव्हे तर पाण्याखाली बसून किंवा अन्य काही प्रकारेही हे कोडे सोडवण्याचे विक्रम आहेत. आता हुला हूप करीत हे कोडे सोडवण्याचा विक्रम एक तरुणीने केला आहे. हुला हूप हे खेळणे वर्तुळाकार मोठ्या रिंगसारखं असते; जे कमरेत ठेवून गोल गोल फिरवले जाते. हे हुला हूप व्यायाम करण्यासाठीही कमालीचे योगदान देते. तसेच याचा उपयोग करून अनेक कार्यक्रमांत मनोरंजनासाठी मजेशीर खेळसुद्धा खेळण्यात येतात. आता असे हूला हूप करत रुबिक्स क्यूब सोडवत असलेल्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एन. एम. श्री ओवियासेना या भारतीय मुलीने शरीराभोवती पाच हुला हूप फिरवीत एका हातानं रुबिक क्यूबचे कोडे सगळ्यात वेगात सोडवून दाखवले आहे. ही भारतीय मुलगी रंगमंचावर उभी आहे आणि उजव्या हातात दोन, एक मानेवर, तर दोन कमरेभोवती तसेच एक पायात हुला हूप फिरवताना दिसत आहे. तिचे हे अनोखं कौशल्य पाहून अनेक लोक थक्क झाले.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल असेल की, ही मुलगी शरीराभोवती हुला हूप फिरवीत असताना एका हाताने रुबिक क्यूबचे कोडेसुद्धा सोडवते आहे. हुला हूप आणि रुबिक क्यूबचे कोडे सोडवणे या दोन्ही प्रकारांचे उत्तम सादरीकरण तिने केले; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ही भारतीय मुलगी 51.24 सेकंदांत रुबिक क्यूबचे हे कोडे सोडवण्यात यशस्वी ठरली आणि अशा पद्धतीने सगळ्यात वेगात कोडं सोडवण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं तिची नोंद केली.'पाच हुला हूप फिरवीत असताना ओवियासेनाद्वारे 51.24 सेकंदांत सगळ्यात वेगात रुबिक क्यूबचं कोडं सोडवलं गेलं आहे', अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भारतीय तरुणीच्या एकाग्रतेचं आणि तिच्या अद्भुत कौशल्याचं कमेंट्समध्ये कौतुक करताना दिसून आले.