नवी दिल्ली : अनोख्या रंगांचे बटाटे, गाजर व अन्यही भाज्या पाहायला मिळत असतात. फळांबाबतही असा प्रकार पाहायला मिळतो. केळी हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची असतात हे आपण पाहतो. मात्र केळी लाल रंगाचीही असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ही अनोख्या रंगाची केळीही आरोग्यदायी असतात.
ही लाल केळी सामान्य केळापेक्षा आकाराने लहान असतात. आपल्या रंगामुळे ही केळी नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. ही लाल केळी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यासाठीही ही केळी उपयुक्त आहेत. विशेषतः बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी लाल केळी गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्य केळांपेक्षा लाल केळात लोह खनिज अधिक प्रमाणात असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही अशा लाल केळाचा उपयोग होतो. या केळ्यांच्या सेवनाने पोटात गारवा राहतो. नाश्त्यावेळी हे केळ खाल्ल्यास पोट भरल्याची भावना बराच वेळ राहते. अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या केळाचे सेवन लाभदायक आहे.