पिंपरी : पुढारी वृत्तसेवा किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने चार पिस्तुलांसह अटक केली. त्यानंतर लगेचच पुनावळे येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून देखील पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही कारवाया करणाऱ्या पथकांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.
किशोर बापू भोसले (३१, रा. पुनावळे), अमित दत्तात्रय पाटुळे वय (२३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत), अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (३४, रा. पुनावळे गावठाण), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून, त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आली. दरम्यान, त्यांनी पिस्तुल संशयीत आरोपी गोरगले याच्या सांगण्यावरून आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यानुसार, संशयीत आरोपी गोरगले यास अटक केली. त्यानंतर संशयीत आरोपींकडे पिस्तूल आणण्याचा उद्देश विचारला असता, त्यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्याशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली. संशयीत आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे राजकीय आणि पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी दरोडा विरोधी पथकाने प्रमोद सोपान सांडभोर (३३, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (३०, रा. धनगर बाबा मंदिराच्या मागे काळेवाडी), याला चार पिस्तुलांसह अटक केली आहे. संशयीत आरोपी दिवंगत किशोर आवारे यांचे निकटवर्ती असल्याने ते देखील हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :