पुढारी ऑनलाईन : पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका तरूणीवर काल (दि.२८ जून) भरदिवसा कोयत्याने हल्ला झाल्याचा प्रकार घडला. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत, तुमच्या आसपास अशा घटना घडत असल्यास त्याकडे डोळसपणे लक्ष द्या अन् वेळीच धावून जा असे आवाहन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून म्हटले आहे की, पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान येथे उपस्थित असणारे काही लोक बघ्याची भूमिका घेत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण या मुलीच्या मदतीला धावून आला. त्याने जे धाडस दाखवले त्याबद्दल अभिनंदन, असेही ते म्हणाले. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना चौकशीचा फेरा मागे लागेल असा विचार मनात येत असेल, तर पोलिसांनी लोकांना आश्वस्त केले पाहिजे, असेदेखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना घडल्यानंतर काही दिवसांतच दुसरी घटना घडणे ही गंभीर बाब आहे. सरकारचा कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देत, प्रशासनाकडून धाक निर्माण केला पाहिजे, असे देखील म्हटले आहे. त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करतो की, तुमच्या आसपास अशा घटना घडत असल्यास वेळेत धावून जा. असेदेखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.