Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार; सकल भागात साचले पाणी, झाड पडून तरूणाचा मृत्‍यू | पुढारी

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार; सकल भागात साचले पाणी, झाड पडून तरूणाचा मृत्‍यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहर व उपनगरात पावसाची संततधार सुरू असून, सकल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून पालिकेने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्याकरीता महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल रस्त्यावर उतरले आहेत. दरम्‍यान मामलेदारवाडी जंक्शन, मालाड (पश्चिम) येथे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाड पडून कौशल दोशी (वय 38) गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मुंबई सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्व उपनगरात सर्वाधिक 42 मिमी पावसाची नोंद झाली. या काळात पश्चिम उपनगरातही 40 मिमी पाऊस झाला. मात्र शहरात अवघा 12 मिमी पाऊस झाला. सकल भागात पाणी तुंबल्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या विलंबाने धावत आहे. रेल्वे मार्गात मात्र कुठेही पाणी आलेले नाही.

मुंबई शहर व उपनगरात आगामी दोन दिवस जोरदार व अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी, पालिका आयुक्त वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावर, वाकोला मिनी पंपिंग स्टेशन, धारावी टी जंक्शन, गांधी मार्केट, हिंदमाता येथे जाऊन उपायोजनांची पाहणी करत आहेत.

सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत पाऊस

शहर 12.44
पूर्व उपनगर 42.41
पश्चिम उपनगर 40.46
झाड पडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : 

Back to top button