

राहुल हातोले
पिंपरी(पुणे) : पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशी आणि पर्यटनासाठी येणारे नागरिक यांच्यासाठी सुरू केलेल्या पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेला इतर दिवसांऐवजी गुरुवार, शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर पर्यटकांना घडविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून 1 मे पासून वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली.
त्या वेळी नागरिकांना पर्यटन बसबाबत माहिती नसल्याने संपूर्ण महिनाभर बस जागेवरच होती. मात्र, त्यानंतर या पर्यटन बसला जून महिन्याच्या सुरुवातीपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निगडीमधील भक्ती-शक्ती बसस्थानक येथून पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा सकाळी 9 वाजता सुरू होते. प्रवाशांच्या मागणीनुसार दोन वातानुकूलित बस सुरू केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड दर्शन बसमधून शहरातील प्रमुख स्थळांना भेटी देण्यात येतात. त्यामध्ये भक्ती-शक्ती उद्यान, प्रतिशिर्डी शिरगाव, देहूगाव, देहू गाथा मंदिर, बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, चापेकर बंधू स्मारक, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पू घर /दुर्गा टेकडी आदी स्थळांचा समावेश आहे.
बस पास काढण्यासाठी पास केंद्रांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. पंचवीसहून अधिक प्रवाशांशिवाय पिंपरी चिंचवड पर्यटन बस रस्त्यावर उतरवणे पीएमपीएमएल प्रशासनाला परवडणारे नाही. मात्र आता प्रवाशी जास्त झाल्याने दोन वातानुकूलित बसची सोय केली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी पर्यटन बस निगडीवरून पिंपरी डेपोला वर्ग केली आहे. मात्र, निगडीमधून गाडी सुटणार आहे.
सरकारी कार्यालयांसह बर्याच खासगी संस्थांना शनिवारी आणि रविवारी सुटी असते. तर कंपन्यांना गुरुवारी सुटी असते. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच, शहरात फिरण्यासाठी येणारे नागरिक कुटूंबासह वातानुकूलित बसने पर्यटनाचा आस्वाद घेत आहेत.
कुटूंबासह सुटीच्या दिवशी आम्ही पिंपरी-चिंचवड पर्यटन बसचा आस्वाद घेत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नातेवाईक पिंपरी-चिंचवड येथे आले की, त्यांना पर्यटन बसमध्ये बसविल्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड दर्शनाची हौस पूर्ण होत आहे.
– शैलेश शिंदे, आकुर्डी.
कुटूंबासह सुटीच्या दिवशी आम्ही पिंपरी-चिंचवड पर्यटन बसचा आस्वाद घेत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नातेवाईक पिंपरी-चिंचवड येथे आले की, त्यांना पर्यटन बसमध्ये बसविल्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड दर्शनाची हौस पूर्ण होत आहे.
– शैलेश शिंदे, आकुर्डी.
हेही वाचा