गव्हर्नन्स पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात मानाचा तुरा

गव्हर्नन्स पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात मानाचा तुरा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अ‍ॅपने भारत सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये गव्हर्नन्स श्रेणीमध्ये देशात दुसरे स्थान पटकावले आहे. या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी रविवारी (दि.27) सांगितले. देशभरातील 100 स्मार्ट सिटीतील पात्र 80 शहरातून पिंपरी-चिंचवडला गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे 27 सप्टेंबरला होणार्‍या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर, राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

स्मार्ट सिटी मिशन नाविन्यपूर्ण स्मार्ट सोल्यूशन्सद्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ, टिकाऊ वातावरण व सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींत क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या सुमारे 2 लाख 50 हजार वापरकर्ते अ‍ॅप, वेब पोर्टल व सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहेत. महिन्याला सुमारे 5 ते 6 लाख नागरिक त्याचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

पालिकेच्या सेवा, सुविधा अ‍ॅपवर

पीसीएमसी स्मार्ट सारथी अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढला आहे. शहरातील उपयुक्त माहितीचे संकलन करण्यात आले आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर तसेच, मिळकतधारकांच्या मोबाईलवर मिळकतकराची माहिती मिळते. कर ऑनलाइन भरणे सुलभ झाले आहे. विवाह नोंद, जन्म व मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिक ऑनलाइन अर्ज करतात. नागरवस्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑनलाइन तक्रारीनंतर पालिकेकडून निरसन केले जाते. पालिकेचे कार्यालय, रूग्णालय, दवाखाने, रक्तपेढ्या, उद्याने, स्वच्छतागृह, शाळा शोधण्यासाठी जीपीएस सोय उपलब्ध आहे.

बहुपयोगी अ‍ॅप

अ‍ॅपद्वारे तातडीच्या कारणांसाठी रुग्णवाहिका सेवा, पोलिस विभाग, शहर वाहतूक पेट्रोलिंग विभाग यांच्याशी आपत्कालीन संपर्क साधता येतो. स्थानिक विक्रेते, व्यवसाय, दुकाने व ठिकाणांची माहिती नागरिकांना मिळते. पालिकेच्या वतीने विविध वक्त्यांचे ऑनलाइन वेबिनार नियमितपणे प्रसारित केली जातात. ब्लॉग व लेख लिहून नागरिकांना त्यांचे विचार, कल्पना व्यक्त करता येतात. कोरोनाकाळात रूग्णालयातील बेड उपलब्धता, कोरोना प्रतिबंधक डोसची उपलब्धता व केंद्र, डॅशबोर्ड व इतर आवश्यक माहिती या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा लाभ शहरातील नागरिक घेत आहेत, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news