Pune Ganeshotsav 2023 : लोककलावंतांना बाप्पा पावला! योग्य मानधन अन् रसिकांची दादही !

Pune Ganeshotsav 2023 : लोककलावंतांना बाप्पा पावला! योग्य मानधन अन् रसिकांची दादही !
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची लोकधारा असो वा कीर्तनाचे कार्यक्रम, भजन संध्या असो वा शाहिरीचे कार्यक्रम, लोककलावंतांसाठी यंदाचा गणेशोत्सव खास ठरत आहे. कारण गणेशोत्सवाच्या सीझनमध्ये लोककलावंत ठिकठिकाणी कार्यक्रम सादर करत असून, काही कलावंत महाराष्ट्रभर दौरेही करत आहेत. त्यामुळे सकल कलांचा अधिपती… असणार्‍या गणपतीची कृपादृष्टी लाभून लोककलावंतांना एकप्रकारे बाप्पाचा राजाश्रय उत्सवापुरता का होईना लाभत आहे.

उत्सवातील यात्रा – जत्रांसह मंडळांच्या ठिकाणी कलावंत सादरीकरण करत आहेत. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये कलावंतांचे दौरे होत आहेत आणि गणेशोत्सव हा कलावंतांसाठी पर्वणी ठरत आहे. कार्यक्रमांसाठी कलावंतांना योग्य मानधनही मिळत आहे. कोरोना काळात दोन वर्षे गणेशोत्सवात लोककलावंतांकडे काम नव्हते. पण, मागील वर्षीच्या उत्सवात कलावंतांना कार्यक्रम मिळाले आणि त्यांना चांगली आर्थिक कमाई करता आली.

यंदाचा गणेशोत्सवही लोककलवंतांसाठी खास ठरत आहे. कारण, उत्सवकाळात अनेक कलावंत कार्यक्रम सादर करत असून, मंडळे, सोसायट्यांचे गणेशोत्सव, यात्रा-जत्रा आदी ठिकाणी कलावंत सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत महाराष्ट्राची लोकधारा, शाहिरी, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. कलावंत उत्सवात दोन ते तीन कार्यक्रम सादर करत आहेत आणि त्यासाठी त्यांना 5 ते 15 हजार रुपयांचे मानधनही मिळत आहे. काही ठिकाणी तमाशाचे कार्यक्रम, तर काही ठिकाणी लावणी महोत्सवही होत आहेत.

निर्माते शशिकांत कोठावळे म्हणाले, 'गणेशोत्सव लोककलावंतांसाठी आनंद घेऊन आला आहे. राज्यभर कलाकार ठिकठिकाणी जाऊन कला सादर करत आहेत. मेहनत आणि ऊर्जेने सर्वजण आपल्या कलेचे सादरीकरण करत असून, त्यांच्या कलेला दादही मिळत आहे, चांगले अर्थाजनही कलावंतांना मिळत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे कलावंतांकडे काम नव्हते. पण, गेली दोन वर्षे गणेशोत्सवात कलावंतांना काम मिळत आहे आणि त्यामुळे कलावंत आनंदित आहेत.'

गणेशोत्सवात कलावंत महाराष्ट्राची लोकधारा, शाहिरी कार्यक्रम, वाघ्या मुरळी, भजन-कीर्तन असे लोककलांवर आधारित कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यासाठी राज्यभर ते दौरेही करत आहेत. मीही काही ठिकाणी शाहिरी कार्यक्रम सादर करत असून, कलावंतांसाठी यंदाचा गणेशोत्सव कार्यक्रमांचा ठरत आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही कलावंतांना कार्यक्रमांसाठी चांगले बुकिंगही मिळाले आहे.

– शाहीर हेमंत मावळे, लोककलावंत

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news