पिंपरी : वर्षा कांबळे : कोरोनाशी सामना करण्यासाठी त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे, हे आता सर्व जनमानसात रुळू लागले आहे. त्यामुळे आता पहिल्यासारखी भीती आणि गैरसमज न राहता नागरिक आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडत आहेत.
दोन वर्षांनंतर सर्व क्षेत्रांतील दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. प्रवासी सेवा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे गाव दूर झालेल्या किंवा आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी आसुसलेल्या व्यक्ती बिनधास्त गावोगावी जात आहेत. बंद असलेली पर्यटनसेवाही पूर्ववत सुरू झाली आहे.
नागरिकांना मास्क लावून बाहेर पडावे लागते. मास्क हा वेशभूषेतील एक अविभाज्य भाग बनला आहे. तसेच जसा मोबाईल न विरसता घ्यावा लागतो.
तसा मास्कही घ्यावा लागतोच. सॅनिटायझरची बाटली खिशामध्ये किंवा पर्समध्ये असतेच. ऑफिसमध्येदेखील सॅनिटायझर स्टॅण्ड बसवले आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये, दुकानात एक माणूस रजिस्टर घेऊन टेबल टाकून दारात बसला आहे.
आलेल्या प्रत्येकाकडे मास्क लावला आहे का हे पाहणे, त्याचे तापमान तपासणे, सॅनिटायजर दिल्याशिवाय प्रवेश न देणे हे काम पाहत असतो.
कोरोनाच्या कहरामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांमध्येदेखील सोशल डिस्टसिंग, सॅनिटायजर, मास्क अनिवार्य असल्याने विद्यार्थी या सर्व गोष्टी सांभाळून शाळेला हजेरी लावत आहेत.
कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये कोरोना रूग्ण संख्येचा ज्या-ज्या वेळी उच्चांक झाला त्यावेळी शासनाला कडक निर्बंध घालावे लागले होते. मात्र, तिसर्या लाटेच्यावेळी अशी वेळ आली नाही.
आता कोरोनाची तिसरी लाटदेखील ओसरली आहे. नागरिकांचे व्यवहार कोरोनाचे नियम पाळून सुरळीत सुरू आहेत. सध्या लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.