पुणे : पुढारी वृत्तसेवा
पोस्टामार्फत देशात तसेच परदेशात आता कापडी पॅकिंगचे पार्सल पाठविता येणार नाही, अशी स्पष्ट सूचना देशभरातील सर्वच टपाल कार्यालयांच्या पोस्ट मास्तरांना केंद्र सरकारने केली आहे. टपाल खात्यातर्फे या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
काही नागरिक कापडामध्ये पार्सल गुंडाळून टपाल कार्यालयातील कर्मचार्यांच्या हाती देत होते. परंतु, आता अशा पद्धतीने पार्सलवर केलेले कापडाचे पॅकिंग चालणार नाही. कापडी पँकिंगचे पार्सल टपाल कार्यालयातील कर्मचार्यांनी स्वीकारायचेदेखील नाही, असेही टपाल खात्याने आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, कुरिअर कंपनीमार्फत आलेल्या पार्सलमधून तलवारी पाठविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. टपाल खाते हे सरकारी अखत्यारीखाली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयातील कर्मचार्यांनीदेखील पार्सलची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. टपाल खात्याचे दिल्लीस्थित मुख्य कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक (पार्सल डायरोक्टरेट) अजयकुमार रॉय यांनी पार्सलसंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
खबरदारीचे उपाय म्हणून कर्मचार्यांनी एकदा त्यांच्या हातात पार्सल आल्यानंतर ते पुन्हा ग्राहकाच्या हातात द्यायचे नाही. ते पार्सल व्यवस्थित तपासून पाहणे बंधनकारक आहे. तसेच पार्सलवर इंडिया पोस्टचा लोगो असलेली पट्टी लावणे अत्यावश्यक आहे. शहरांतील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये पार्सलची सुविधा असते. त्या ठिकाणी तेथील कर्मचार्यांनी आता जबाबदारीने पार्सल पॅकिंग करावे, असेही टपाल खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.
पुणे येथील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) चे पोस्ट मास्तर एन. एस. बनकर म्हणाले की, पार्सलवरचे कापडी पॅकिंग एक एप्रिलपासून बंद केले आहे. टपाल कार्यालयांत पॅकिंगचे स्टँडर्ड बॉक्सेस आहेत. त्याद्वारे पार्सल पाठविता येऊ शकतात.