पुणे जिल्ह्यात वाढणार ऑक्सिजनचा साठा

Oxygen Plant 1
Oxygen Plant 1
Published on
Updated on
  • 37 ऑक्सिजन प्लांट, 20 लिक्विड टँक कार्यान्वित

पुणे : नरेंद्र साठे : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पुणे शहरासह जिल्ह्यात प्रशासनाला ऑक्सिजनच्या नियोजनासाठी तारेवरची कसरत करावी लागली. आता पुन्हा तशी वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने 65 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी 37 कार्यान्वितही झाले आहेत. साठवणुकीसाठीही 26 लिक्विड टँकचे नियोजन केले आणि त्यापैकी 20 कार्यान्वितही झाले आहेत.

ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावपळ होऊ नये, यासाठी
प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. ऐनवेळी होणारी धावाधाव टाळण्यासाठी ऑक्सिजन प्लांटसह साठवणुकीवर अधिक भर दिला गेला आहे. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजननिर्मिती आणि ऑक्सिजन साठवण क्षमता कमी असल्यामुळे प्रशासनाने अहोरात्र काम करून रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम केले. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑक्सिजन साठवणूक क्षमता 675 मेट्रिक टन एवढी करण्यात आली आहे. यामध्ये 211 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणूक खासगी रुग्णालयात करता येणार आहे.

ऑक्सिजन प्लांटद्वारे 38 हजार 206 लिटर प्रतिमिनिट (एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. त्यात पुणे शहरात 16 हजार 266 लिटर प्रतिमिनिट, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 हजार 50 लिटर प्रतिमिनिट, तर ग्रामीण भागात 15 हजार 890 लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. 65 प्लांटपैकी सर्वाधिक 22 ग्रामीण भागात असून, 18 कार्यान्वित झाले आहेत. दुसर्‍या लाटेत पुण्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या एक लाखाहून अधिक झाली होती. त्या काळात ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णालयांकडून प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती.

जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सिजन इतर जिल्ह्यांना पाठवून पुणे आणि विभागातील जिल्ह्यांसाठी प्रशासनाने रायगडसह परराज्यातून ऑक्सिजन मागवला होता. तेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व नियोजन केले जात होते. अशी तारेवरची कसरत पुन्हा होऊ नये, यासाठी प्रशासनाने ऑक्सिजन साठवणूक क्षमता आणि ऑक्सिजन निर्मिती प्लांटची तयार केली आहे.

ग्रामीण भागात सर्वांत जास्त प्लांट

पुणे महापालिका भागात ऑक्सिजनचे 12 प्लांट कार्यान्वित झाले असून, 6 प्रस्तावित आहेत. लिक्विड टँकमध्ये 9 तयार केले असून, 3 प्रस्तावित आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वांत कमी तीनच ऑक्सिजनचे प्लांट कार्यान्वित झाले असून, चार बाकी आहेत. सहा लिक्विड टँक तयार केले असून, एक शिल्लक आहे. ग्रामीण भागात सर्वांत जास्त बावीस प्लांट तयार झाले असून, अठरा शिल्लक आहेत. लिक्विड टँक पाच तयार केले असून, दोन बाकी आहेत.

अशी आहे क्षमता

लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता : 464 मेट्रिक टन

खासगी रुग्णालय ऑक्सिजन साठवणूक क्षमता : 211 मेट्रिक टन

ऑक्सिजन प्लांटची प्रतिमिनिट क्षमता : 38 हजार 206 लिटर

अशी आहे स्थिती

ऑक्सिजन प्लांट : 65
कार्यान्वित प्लांट : 37
प्रस्तावित प्लांट : 28
लिक्विड टँक : 26
कार्यान्वित लिक्विड टँक : 20
प्रस्तावित लिक्विड टँक : 6

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news