

भोर: भोर येथे रविवार, दि. 25 जानेवारी रोजी होणाऱ्या 11व्या फुले-शाहू-आंबेडकर विचारप्रसार साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, स्वागताध्यक्ष प्राचार्य सुरेश खराते आणि संयोजन समितीच्या अध्यक्ष हसीना शेख यांनी दिली.
सकाळी भोर चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून व अभिवादन करून संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. ‘क्रांतिसिंह नाना पाटील विचारनगरी’ मंथनासाठी सज्ज झाली असून, ज्येष्ठ समाजसेवक स्मृतिशेष डॉ. बाबा आढाव विचारमंचावर संमेलनातील सर्व कार्यक्रम होणार आहेत.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आणि भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी काळात हे संमेलन होत असून, डॉ. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचा ‘कीर्तनातून संविधानाकडे’ हा विशेष कार्यक्रम संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
विचारचळवळ व संदर्भमूल्य असलेली ‘सूर्यफुले’ ही प्रा. सुजित चव्हाण संपादित स्मरणिका यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच विविध स्वरूपांचे पुरस्कार वितरण, नाट्यप्रयोग, ग््रांथचर्चा, एकांकिका, कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाचे संमेलन होणार आहे. या संमेलनास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुरेश गोरेगावकर, कॉ. ज्ञानोबा घोणे, डॉ. रोहिदास जाधव, राहुल गायकवाड, योगेश कांबळे, शांताराम जगताप, पोपटराव चव्हाण, आनंदा जाधव, शत्रुघ्न तायडे, प्रफुल्ल बनसोडे, मनीष यादव, बृहस्पती जाधव, संतोष शिंदे, अरुण डाळ, ॲड. किरण घोणे, संजय गायकवाड, अक्षय जाधव आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.