Pollution : पुणं रात्रीचे 4 तासच असतंय शुद्ध

Pollution : पुणं रात्रीचे 4 तासच असतंय शुद्ध
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात वाहनांची घनता असणारे दुसरे शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली आहे तसेच देशातील सर्वांत चांगले राहण्यालायक शहर असा लौकिक मिळाल्याने येथे बांधकामे प्रचंड वेगाने होत आहेत. रस्ते दुरुस्तीमुळे तर खोदकामांची मोजदादच नाही, त्यामुळेही प्रदूषण वाढले आहे. याच प्रमुख कारणांनी शहराची हवा अवघी चार ते पाच तास शुध्द असते. त्यामुळे शुध्द हवेचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
संबंधित बातम्या :
भारतातील टियर-वन शहरांच्या यादीमध्ये पुणे हे एकमेव नॉन-कॅपिटल शहर आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि बेंगळुरूसारख्या महानगरांप्रमाणेच शहराला संबोधले जाते. मात्र, वरील सहा महानगरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्या वेगाने विस्तारली तितका विस्तार पुण्यात झाला नाही. तज्ज्ञांच्या मते मेट्रोचे जाळे मुंबई इतके सुंदर पुण्यात झाले असते, तर इतके प्रदूषण वाढले नसते. मेट्रो नसल्याने इथे  वैयक्तिक वाहनांची संख्या 1999  पासून प्रचंड वेगाने वाढली. आज 2023 मध्ये ही वाहने सामावण्यासाठी रस्त्यांची रुंदी कमी पडू लागली आहे.
पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत रस्तेही घेत नाहीत श्वास
शहराचा सर्वच बाजूंनी झालेला विस्तार त्यामुळे शहराबाहेरून येणारी वाहतूक चोवीस तास सुरू असते. उत्तर रात्री 1 ते पहाटे 5 या अवघ्या चार तासांसाठीच शहरात शांतता हल्ली जाणवते. कारण या काळात वाहनांची वर्दळ खूप कमी असते. मात्र, पहाटे 6 वाजता सर्व प्रकारची वाहने रस्त्यावर येतात. सिग्नलही सुरू होतात. त्यामुळे शहराच्या हवेत अतिसूक्ष्म धुलिकण (पीएम.2.5) व सूक्ष्म धुलिकण (पीएम 10) यांचे प्रमाण वाढू लागते. दुपारी 12 वाजता याचे प्रमाण वाढलेले असते. पुन्हा सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत धुलिकणांचे प्रमाण खूप वाढलेले असते.
शहरावर 65 ते 70 लाख वाहनांचा भार 
सरकारी आकडेवारीनुसार 2016-17 पर्यंत पुण्यात 2.3 दशलक्ष दुचाकी आणि सात लाख चारचाकी वाहने होती, त्यात 2023 पर्यंत खूप मोठी भर पडली आहे. त्यामुळे शहराची अवस्था चिंताजनक या प्रकारात गेली आहे. 2017 पर्यंत शहरात प्रतीकिमी 1 हजार 260 वाहने होती, तेव्हाच शहर वाहन घनतेत दिल्लीनंतरचे दुसरे शहर ठरले होते. आता ही घनता प्रतीकिमी 1 हजार 500 इतकी झाली आहे.आरटीओच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात सर्व मिळून सुमारे 42 लाख वाहने आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 25 लाख वाहने आहेत. या दोन्ही जुळ्या शहरांचीच वाहन संख्या 65 लाखांच्या जवळपास जाते. त्यात जिल्हा व राज्याच्या कानाकोपर्‍यांतून शहरात रोज किमान 1 ते दीड लाख वाहनांची भर पडते. त्यामळे शहरावर 60 ते 70 लाख वाहनांचा भार आहे. त्यामुळेच इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण इथे मोठ्या प्रमाणावर आहे.
शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे धुलिकण प्रदूषण 
तर आहेच. त्यात मोठी भर पडली आहे ती सतत सुरू असलेल्या खोदकामांमुळे होणा-या प्रदुषणाची. त्यामुळे गर्दीच्या भागात सतत स्मॉग निर्माण होत आहे. यात धूर, धूळ आणि धुके यांचे मिश्रण दिवाळीत प्रामुख्याने जास्त दिसले. खोदकामांची संख्या विविध कारणांनी वाढल्याने शहरातील हवा प्रदूषण वाढले आहे. हे कमी करणे आपल्या हाती आहे.
                                                               – डॉ. बी. एस. मूर्ती, प्रकल्प संचालक, सफर संस्था, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news